34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसंपादकीयविचारनिष्ठ लढवय्या सेनापती!

विचारनिष्ठ लढवय्या सेनापती!

एकमत ऑनलाईन

प्रा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्रातील एक झुंजार लढवय्ये नेतृत्व. सहा दशकांहून अधिक काळ राजकारण, समाजकारण, वैचारिक प्रभाव, लोकचळवळी, जनांदोलने यावर प्रभाव निर्माण करणारे एन. डी. सर हे राज्यातील लोकचळवळीचे भीष्माचार्यच! अखेरच्या श्वासापर्यंत हा झुंजार लढवय्या कष्टकरी, शेतकरी, कामगार, श्रमजीवी यांच्यासाठी अखंड लढत राहिला व या वर्गांचा सेनापती म्हणून खंबीर नेतृत्व देत राहिला. त्यांच्या निधनाने राज्यातील लोकचळवळ पोरकी झाली आहे. मात्र, त्याहून जास्त नुकसान झाले आहे ते विचारनिष्ठेचे! एन. डी. सर हे महाराष्ट्रातील विचारनिष्ठेचे दीपस्तंभ होते! हल्लीच्या विचारनिष्ठेला तिलांजलीच दिल्याच्या सार्वत्रिक वातावरणात अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या विचारांशी, तत्त्वांशी कधीच तडजोड न करता सदैव विचारनिष्ठ राहिलेल्या एन. डी. सरांचे जाणे हे विचारनिष्ठ मंडळीसाठी अत्यंत वेदनादायक आहे. या अर्थाने आज राज्यातील विचारनिष्ठाच पोरकी झाली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. शेतकरी-कष्टक-यांचे सेनापती म्हणून एन. डी. सर किती ‘ग्रेट’ होते याचा अनुभव तर उभ्या महाराष्ट्राने सहा दशकांपासून घेतलेलाच आहे, मात्र, त्याच्याच जोडीला अभेद्य विचारनिष्ठा काय असते व ती जपताना जीवनात कसे तावून सुलाखून निघावे लागते याचे मूर्तिमंत दर्शन एन. डी. सरांनी राज्यालाच नव्हे तर जगाला घडविले. त्यांचा हा दुर्मिळ गुणच त्यांना रत्नांच्या गर्दीतही वेगळेपण मिळवून देणारा ठरतो. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला काँग्रेसमधील उच्चवर्णीय व भांडवलदार-धार्जिण्या नेतृत्वाशी झालेल्या मतभेदातून काँग्रेसमधील सत्यशोधकी विचारांच्या मंडळीने शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्या सत्यशोधकी चळवळीचा वारसा एन. डी. पाटील यांनी स्वीकारला आणि ते या विचारांचे प्रवक्ते बनले.

आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अत्यंत निष्ठेने हे प्रवक्तेपद बजावत आपली विचारनिष्ठा सिद्ध केली. राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनातीलच नव्हे तर वैयक्तिक खाजगी जीवनातील कुठलाही मोह त्यांच्या या विचारनिष्ठेला जरासाही धक्का लावू शकला नाही, हेच एन. डी. सरांचे सर्वांत मोठे वेगळेपण आहे. शेकाप वाढला तरी व तो आक्रसला तरी त्यांनी कधीच आपली विचारनिष्ठा किंचितशीही ढळू दिली नाही. १९६९ ते १९७८ व १९९५ ते २०११ अशी २५ वर्षे त्यांनी शेकापचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी जी आंदोलनांची जंत्रीच घडवली त्यातून केवळ कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजूर, आदिवासी या वर्गाला न्याय मिळाला असे नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणीही झाली व जडणघडणही झाली. शेतमालाला रास्त दराची मागणी देशात सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाने केली होती. त्यामागची तात्त्विक बैठक ही एन. डी. पाटील यांची होती. सहकारमंत्री म्हणून पुलोद सरकारमध्ये कार्यरत असताना एन. डी. पाटील यांनी कापूस खरेदी एकाधिकार योजनेची अत्यंत यशस्वी अंमलबजावणी करून ही योजना यशस्वी करून दाखविली. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या यशस्वी जनआंदोलनांची यादी तर प्रचंड मोठी आहे.

गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी, दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठीचा लढा, सेझविरोधी आंदोलन, उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठीचे आंदोलन, शिक्षणविषयक श्वेतपत्रिका, टोलविरोधी आंदोलन, एन्रॉनविरोधी आंदोलन, वीजदरवाढीच्या विरोधातील आंदोलन, पिण्याच्या पाणीहक्काचे आंदोलन, कापूस दर आंदोलन, शिक्षण बचाव आंदोलन, जागतिकीकरणविरोधी लढा अशा अनेक आंदोलनांची जंत्रीच एन. डी. सरांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने पाहिली व त्यातूनच ते राज्यातल्या शोषित, शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी या घटकांचे बुलंद आवाज व लढवय्ये सेनापती बनले आणि अखेरच्या श्वासापर्यंत या लढवय्या सेनापतीने कधी क्षणाची उसंत घेण्याचा, निवृत्त होण्याचा विचारही केला नाही. एन. डी. सरांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय राहिला तो शिक्षण! प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असले पाहिजे याविषयी ते कायम आग्रही राहिले. ही विचारनिष्ठा त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा कारभार सांभाळताना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला ‘पदव्या देणारा कारखाना’ हे स्वरूप कधीही येऊ दिले नाही. शिक्षणाच्या विस्ताराबरोबरच गुणवत्तेबाबत त्यांनी कायम आग्रही भूमिका घेतली.

सामाजिक विषमता, अंधश्रद्धा याविरोधात ते आयुष्यभर अत्यंत कठोरपणे लढत राहिले व हा लढा लढताना प्रत्येक बाबीची सुरुवात स्वत:पासून करत त्यांनी एक आदर्श घालून दिला. तसे पाचवेळा गुलालात न्हाऊनही ते सत्तेच्या सर्व दुर्गुणांपासून कायम लांब राहू शकले कारण त्यांची स्वत:च्या विचारनिष्ठेशी असणारी अतूट बांधीलकी! याच बांधीलकीने त्यांना आयुष्यभर संघर्षशील राहण्याचे बळ दिले. त्यामुळे एन. डी. सर म्हणजे संघर्ष हेच समीकरण राज्यात रूढ झाले. मात्र, त्यांच्या नेतृत्वात झालेला कुठलाही संघर्ष हा अविचारी किंवा तत्वहीन नव्हता. त्यांनी ही काळजी आयुष्यभर घेतली. दांडगा व्यासंग, अफाट वाचन, अभ्यास आणि त्याच्या जोडीला अमोघ वक्तृत्व यातून प्रत्येक आंदोलनात ते वैचारिक बैठक स्पष्टपणे सर्वांच्या मनात बिंबवत! त्यांची वाणी ही आंदोलनात जान निर्माण करून टाकणारी असायची. त्यांची भाषणे त्यामुळेच निव्वळ भाषणे असायची नाहीत तर श्रोत्यांची वैचारिक बैठक पक्के करून टाकणारे अभ्यासवर्गच असायचे. एन. डी. सरांची सर्वांत मोठी खासियत म्हणजे शेकापने प्रबंधातून स्वीकारलेला बोजड मार्क्सवाद व त्याबाबतचा दृष्टिकोन त्यांनी अत्यंत सोप्या, ओघवत्या भाषेतून व्यवहारातल्या उदाहरणांसह खेड्यापाड्यातील निरक्षर शेतकरी, मजुरांना समजावून सांगितला, पटवून दिला व त्यांना त्या विचारावर चालण्याचे वैचारिक बळ प्राप्त करून दिले.

१९६० ते १९८२ या काळात विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांना अत्यंत आक्रमकपणे वाचा फोडल्याने सरकारला अनेक निर्णय घेणे भाग पडलेच शिवाय त्यांच्या हिताची धोरणे आखणे, राबविणे भाग पडले. हे सगळे करत असताना त्यांनी अनेक पुस्तिका, पुस्तके, ग्रंथ लिहून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला वैचारिक दिशा देण्याचे काम अखंड सुरू ठेवले. जगाच्या बदलत्या परिस्थितीत भारतीय लोकशाहीसमोर उभी राहणारी विविध आव्हाने हा त्यांच्यासाठी चिंतेचा व चिंतनाचाही विषय बनला होता. साम्राज्यवाद व धर्मांधता हे दोन खरे शत्रू आहेत. त्यांच्याविरोधात आपल्याला आयुष्यभर लढत राहावे लागेल हेच ते कार्यकर्त्यांना व समाजाला कायम सांगत राहिले आणि त्यांनी स्वत:ही आयुष्यभर हा विचार आपल्या आचरणातून जपला. एका अर्थाने एन.डी. सर या विचारनिष्ठेवरच आपले संपूर्ण आयुष्य जगले, कार्यरत राहिले. या विचारनिष्ठेनेच त्यांना लढवय्येपणा प्राप्त करून दिला. तो त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांत व पैलूत निग्रहाने बाळगला. त्यातूनच त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैयक्तिक जीवन हे सर्वांपेक्षा वेगळे, सरस व उजवे ठरले. विचारनिष्ठेचा दुर्मिळ गुण प्राणपणाने अंगीकारणा-या या लढवय्या सेनापतीला ‘एकमत’चा अखेरचा ‘लाल सलाम’ व विनम्र आदरांजली!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या