36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसंपादकीय‘टीका महोत्सव’

‘टीका महोत्सव’

एकमत ऑनलाईन

आम्ही भारतीय उत्सवप्रिय आहोत. गणपती महोत्सव असो, दसरा महोत्सव असो किंवा शिमगा महोत्सव असो भारतीयांचे पाय थिरकायला, दणक्यात साजरे करायला तयार असतात. अलिकडे अमुक दिन-तमुक दिन साजरे करण्याचे फॅडच निघाले आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी किमान दोन-अडीचशे दिवस हे कोणते ना कोणते दिन असतातच. त्यापैकी काहींच्या मागे ‘जागतिक’ असा शब्द लावला की तो साजरा करण्याच्या उत्साहाला उधाण येते. अर्थात हा उत्सव साजरा करताना तो कुणाचा आणि कशासाठी याचा विचार करायचा नसतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विरोधक ‘गुंगी गुडिया’ असे संबोधायचे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि धाडसी निर्णयाने अनेकांची मती गुंग केली होती. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक आकस्मिक (धाडसी?) निर्णय जाहीर करून अनेकांची मती गुंग केली आहे. याबाबत त्यांना ‘गुंगा बाहुला’ असे संबोधता येईल.

त्यांच्या काही अचाट अन् अगाध निर्णयांमुळे अनेकांना त्यांनी गुंगवून टाकले आहे. त्यांच्या भक्तांना तर ‘मोदी है तो मुमकीन है’ असेच वाटत असते तर इतरांना ‘स्टंटमॅन’सारखे भासतात. एकाहून एक स्लोगन देण्यात मोदींचा हातखंडा आहे. ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सब का विकास’ ‘डिजीटल इंडिया’, ‘स्मार्ट इंडिया’ ही त्याचीच उदाहरणे गतवर्षी देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, घंटानाद करा असे आवाहन करण्यात आले. लोकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचे पालन केले. परिणामी लोक मिरवणुकांनी रस्त्यावर उतरले आणि सोशल डिस्टन्सिंगचा सामुहिक फज्जा उडाला. कोरोनाला प्रसाराची आयती संधी मिळाली. मोदींनी घराघरात दिवे पेटवून सारे काही प्रकाशमय करण्याचे आवाहन केले, त्याचेही स्वागत झाले. सारे काही प्रकाशमय करण्यात किती तेल जळाले, विज बिले किती फुगली याचा कोणी विचार केला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ‘मोदी है तो मुमकीन है’! सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

रुग्णसंख्येत नेहमीप्रमाणे महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे. देशभरात ही लाट फोफावल्याने देश चिंताग्रस्त बनला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक ज्वर आणि निवडणूक प्रचार ओसरल्यानंतर कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी सज्ज झाले आहेत. त्यांनी आता ‘लस महोत्सव’ जाहीर करून कोरोनाविरुद्धचे युद्ध छेडले आहे. देशातील ‘लस महोत्सव’ कोरोना महामारी विरोधातील दुस-या मोठ्या लढाईची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.नक्षलवाद दाबण्यात अपयश आले असले तरी अशा क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष द्यायचे नसते. सध्या निकड आहे ती कोरोना विरुद्धच्या लढ्याची. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीपासून देशात लस महोत्सव सुरू झाला आहे. हा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत चालेल. या महोत्सवात लोकांनी व्यक्तिगत सुरक्षा व सामाजिक आरोग्य यावर भर देण्याची गरज आहे. प्रत्येकाने लस घ्यावी. प्रत्येक रुग्णावर उपचार व्हावेत, प्रत्येकाने कुणाला तरी वाचवावे, वयस्कर लोक व जे लोक अशिक्षित आहेत, जास्त शिकलेले नाहीत त्यांना लस घेण्यास मदत करावी, ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे व माहिती नाही त्यांना मदत करा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

थोडक्यात काय तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मी जबाबदार’ मोहीम! बाकी कुठे लसींचा खडखडाट आहे, किती लसी वाया जात आहेत, लसीकरणाचा प्राधान्यक्रम या मामुली गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही मात्र ‘लसीकरण महोत्सव’ झोकात साजरा झाला पाहिजे! ब्रिटनने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना विज्ञानाची कास धरली, भावनिक राष्ट्रवादाला तिलांजली दिली आणि व्यावहारिक शहाणपण दाखवले असे दिसून आले. परंतु आम्हाला या गोष्टींचा गंधही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत अनेक शतकांपासून आम्ही शून्यच आहोत. म्हणून तर आम्ही कोरोना हद्दपार करण्यासाठी होमहवन करतो, आमचे पंतप्रधानही एखाद्या प्रसिद्ध मंदिराला भेट देतात आणि ‘कोरोनाचे संकट दूर कर’ असे देवाला साकडे घालतात. खरे तर ‘लसीकरण उत्सव’ ऐवजी विज्ञान, चाचणी, संशोधन आदी आयुष्यभर करायचा उत्सव आहे. कोणत्याही गोष्टीचे उत्सवीकरण कसे करता येईल हेच आम्ही पाहतो.

‘लसीकरण महोत्सवा’च्या निमित्ताने सरकार व विरोधकांचा एकमेकांवर ‘टीका महोत्सव’ सुरू झाला आहे. देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून राज्यांना लसींचा अपुरा पुरवठा करण्यात आला अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. मोदी सरकारने कोरोना स्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली असून देशात लसींची टंचाई निर्माण करून लस निर्यातीला प्राधान्य दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. विरोधी पक्ष देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार विरोधात सुनियोजित रणनिती अंतर्गत संभ्रम व अफवा पसरवीत आहेत अस आरोप पंतप्रधान मोदींनी केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकार कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलत नसल्याची टीका केली. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातच कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक आहे असे सांगून राऊत म्हणाले, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड अशी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना लस व औषध योग्य प्रमाणात न पुरवणं हा अमानुषपणा आहे.सध्या राज्यात टाळेबंदी लागू होणार काय हाच चर्चेचा विषय आहे. टास्क फोर्सने ८-१४ दिवसाची टाळेबंदी करणे योग्य राहील असे म्हटले आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंधासह विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यावर निलेश राणे यांनी ठाकरे सरकार स्वत:चं अपयश झाकण्यासाठी सामान्यांना शिक्षा देत आहे अशी टीका केली. राज्य सरकारने केंद्राकडे जादा लसींची मागणी केली होती. त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, महाराष्ट्राकडे १५.६३ लाख कोरोना डोस उपलब्ध असून साठा नसल्याने लसीकरण बंद असे फलक राज्यात दिसत आहेत. कोविड हा राष्ट्रीय मुद्या असून त्याचे राजकारण करू नये. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राला लस पुरवठा न केल्यास सीरम संस्थेत तयार होणारी लस बाहेर पडू देणार नाही. एकंदरीत ‘टीका उत्सव’ जोरात सुरू आहे.

सहप्रवासी बनून प्रवाशांना लुटणा-या महिलांच्या टोळीला अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या