26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeसंपादकीयसर्वत्र सापळेच सापळे!

सर्वत्र सापळेच सापळे!

एकमत ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे आणि त्याबाबतची भूमिका २२ मे रोजी पुण्यात होणा-या सभेत स्पष्ट करणार असल्याचे समाजमाध्यमांवरून जाहीर करण्यात आले होते. स्वत: राज ठाकरे यांनीच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. प्रकृतीच्या कारणास्तव राज यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितले असले तरी या दौ-यात सुरक्षा देण्यास उत्तर प्रदेश सरकारने नकार दिल्यामुळे राज यांनी हा दौरा स्थगित केल्याची चर्चा होती. ठाकरे यांनी अचानक दौरा स्थगित केल्याने राजकीय कार्यक्रम आणि भूमिकेवरून अनिश्चिततेची मनसेची परंपरा कायम आहे असेही बोलले गेले. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत ५ जूनच्या अयोध्या दौ-याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेकडूनही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या १५ जूनच्या अयोध्या दौ-याची घोषणा करण्यात आली होती. उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा देत भाजपचे गोंडाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी या दौ-याला विरोध केला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला समर्थन दिले होते मात्र उत्तर प्रदेशातून भाजपचे कोणीच राज यांच्या समर्थनार्थ पुढे आले नव्हते. राज यांनी योगी सरकारचे कौतुक केले होते. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. राज यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर, भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना स्वार्थासाठी वापरून घेतो, भाजपने त्यांच्याबाबतीत असे का करावे असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. पुण्याच्या सभेत अयोध्या दौरा का रद्द झाला याचा खुलासा करताना राज म्हणाले, हा दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी त्यांनी विरोधाचा सापळा रचला, त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात भावनेची कदर केली जात नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरवले असते तर माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला असता. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला गेला असता.

हा संभाव्य प्रकार लक्षात आल्याने रचल्या गेलेल्या सापळ्याची कल्पना आली म्हणून दौरा रद्द केला. ब्रिजभूषण यांचे नाव न घेता राज ठाकरे म्हणाले, तिकडे एक खासदार उठतो आणि सरकारला आव्हान देतो, १४ वर्षांपूर्वी हे कुठे होते? उत्तर प्रदेश, बिहारमधून गुजरातमध्ये गेलेल्या हजारोंना मारण्यात आले, हुसकावण्यात आले. मग या सगळ्या प्रकरणात कोणी माफी मागायची, असा प्रश्नही त्यांनी केला. अयोध्या दौरा रद्द का केला याचे स्पष्टीकरण देताना राज म्हणाले, आपल्या जाण्यावरून उत्तर प्रदेशात जे काही घडत होते त्याची कल्पना होती. आपल्यासाठी सापळा रचण्यात आला आहे याची माहिती होती. हे सारे माहीत होते तर सापळा रचला कोणी हेही माहीत असले पाहिजे. मग राज त्याचे नाव का घेत नाहीत? उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. योगी आदित्यनाथसारखा तगडा मुख्यमंत्री आहे. तेथे महाराष्ट्रातील भाजपच्या मित्राला व त्याच्या कार्यकर्त्यांना कोण हात लावणार होते? विरोध करणारा खासदार भाजपाचाच होता. त्याला मोदी, योगी सहज गप्प बसवू शकले असते. मग नक्की सापळा रचला कोणी? त्याचे नाव राज यांना नक्कीच माहीत असेल. राज यांनी दौरा रद्द केल्याने ते बॅकफूटवर गेले असे अनेकांना वाटते तर काही जणांनी ईडीच्या भेटीचा इतका परिणाम झाला का? असा कुत्सित सवाल केला. सापळ्याचे म्हणाल तर पदोपदी सापळे रचण्यात आले आहेत हे सर्वसामान्यांना चांगले माहीत आहे. कारण हे सापळे चुकवतच त्यांना जीवनाचा खडतर प्रवास करावा लागतो.

राजकीय जीवनात एकमेकांना संपवण्यासाठी, सत्ता लाटण्यासाठी सापळे लावले जातात. आपल्या सरकारची आठ वर्षे सुप्रशासन आणि सामाजिक न्यायाला समर्पित होती. देशापुढील मुख्य मुद्यांना बगल देऊन अन्यत्र लक्ष वेधण्याच्या विरोधकांच्या सापळ्यात न अडकता भाजप नेत्यांनी सदैव राष्ट्रहिताच्या मुद्यांनाच प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भाजप पदाधिका-यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, भाजपने आगामी २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करून ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. त्यासाठी कमी मेहनतीत फळाची अपेक्षा ठेवणारा ‘शॉर्टकट’ न अवलंबता दीर्घकाळ आणि सातत्याने मेहनतीने आपले लक्ष्य गाठावयास हवे. सापळे अनेक आहेत. राजकीय दिशाभूल करण्यासाठीही एक सापळा लावण्यात आला आहे की काय अशी शंका येते. तत्कालीन राजकीय फायद्यासाठी धार्मिक अस्मितेचे राजकारण केले जात आहे. गत २२ वर्षांतील महागाईचा उच्चांक आज प्रस्थापित झाला असताना संपूर्ण देश ज्ञानवापी मशिदीपुढे डोळे लावून बसला आहे. ही राजकीय दिशाभूलच म्हणायला हवी. ताजमहाल, कुतुबमिनार, मथुरा असे अनेक विषय पोतडीतून बाहेर काढले जात आहेत. या वादविवादांना पूर्णविराम देऊन विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महागाई, बेरोजगारी, विषमता हे जनतेचे मूळ प्रश्न आहेत.

‘सब का साथ सब का विकास’ साध्य करण्यासाठी कायदा, सुव्यवस्था, शांतता, सलोखा, एकता अबाधित राखणे अत्यावश्यक आहे. निसर्गानेही मानवासाठी एक सापळा लावला आहे. हवामानातील बदलामुळे निसर्गाचे चक्र बिघडले असून त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे. २०३० पर्यंत हे परिणाम तीव्र होणार असून आगामी आठ वर्षांत दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या अहवालात दिला आहे. २०१५ पासून दरवर्षी सुमारे ४०० नैसर्गिक संकटांचा सामना जगभरातील नागरिकांना करावा लागत आहे. हवामानातील बदलाचा वेग असाच कायम राहिल्यास नैसर्गिक संकटांची संख्या वेगाने वाढेल असे या अहवालात म्हटले आहे. येत्या आठ वर्षांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढेल असा इशाराही देण्यात आला आहे. या वर्षापासूनच त्याचा अनुभव येत आहे. दुष्काळाचे प्रमाणही ३० टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीची झळ बसणार आहे. हवामानबदलाच्या वेगाचा परिणाम लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होऊ शकेल. ‘फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था‘च्या चालीवर ‘जाल (ट्रॅप) ऐसे भी होंगे ये कभी…!’

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या