24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसंपादकीयदो गज की दूरी अधुरी...!

दो गज की दूरी अधुरी…!

एकमत ऑनलाईन

कोरोना प्रतिबंधक लसमात्रांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या मुंबई शहरातील सुमारे २५ लाख नागरिकांपैकी केवळ ०.३५ टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असून सर्वांत कमी रुग्ण १८ ते ४४ वयोगटातील आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या होत्या. याचा अर्थ असा की, लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या असल्या तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या २ कोटींच्या वर गेली आहे. या संदर्भात राज्य देशात आघाडीवर आहे. लसीकरण हे कोरोनापासून संरक्षणाकरिता प्रभावी माध्यम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तिसरी लाट येण्याआधी लसीकरण वेगाने करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तेथे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. निर्बंध शिथिल केल्यापासून या वयोगटातील व्यक्तींचा घराबाहेरील वावर वाढला आहे. त्यामुळे या वयोगटामध्ये इतरांच्या तुलनेत बाधित होण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. जवळपास अशीच स्थिती राज्यातील अन्य शहरांतही आहे. लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या तरी संपूर्णपणे सुरक्षा मिळाली असे नाही. ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती मुळात कमी असते. त्यामुळेच या वयोगटाला कोरोनाची बाधा होण्याची जोखीम अधिक आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे शक्यतो टाळल्यास उत्तम. बाहेर पडण्याची वेळ आलीच तर मुखपट्टीचा वापर योग्यरीतीने करायला हवा.

शिवाय सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक. अर्थात आता कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचे संदर्भही बदलत आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी साडेसहा फूट म्हणजे दोन मीटर अंतर पुरेसे नसल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. म्हणजे ‘दो गज की दूरी अधुरी…’ असेच म्हणावे लागेल. कोरोनाचा विषाणू हवेतील कणांतून पसरतो. त्यामुळे बंदिस्त खोल्यांमध्ये तो जास्त पसरला जाऊ शकतो असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘सस्टेनेबल सिटीज अ‍ॅण्ड सोसायटीज’ या नियतकालिकात म्हटले आहे की, शारीरिक किंवा सामाजिक अंतर हे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा घटक नाही. यासाठी मुखपट्टीचा वापर हाच जास्त प्रभावी उपाय ठरू शकतो. संशोधकांनी यात तीन घटकांचा विचार केला आहे. त्यानुसार हवेतील कण वेगाने पसरतात व त्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू पसरू शकतो. त्यासाठी हवेशीर जागा असणे गरजेचे आहे.

बोलताना किंवा श्वास सोडताना कोरोनाचा विषाणू बाहेर पडू शकतो. यात १ ते १० मायक्रोमीटर कणांचा अभ्यास श्वासोच्छवासाच्या दृष्टिकोनातून करण्यात आला. ट्रेसर गॅसच्या मदतीने हवाई बंदिस्त ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ ते १० मायक्रोमीटर या टप्प्यातील कणांमधून कोरोनाचा विषाणू पसरू शकतो असे दिसून आले. अमेरिकेतील एका अभ्यास पाहणीतही असे दिसून आले की, हवेतील कणांवर स्वार होऊन विषाणू पसरू शकतो. इमारतींमधील हवेशीरपणा व शारीरिक अंतर यांचाही तुलनात्मक अभ्यास विषाणू प्रसाराबाबत करण्यात आला. त्यानुसार मुखपट्टीशिवाय बोलताना एखाद्या व्यक्तीच्या तोंडातील विषाणूचे कण एका व्यक्तीकडून दुसरीकडे श्वासामार्फत पसरू शकतात. कमी हवेशीर असलेल्या खोल्यांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते.

हे सारे पाहता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की कोरोनाकाळात जे निर्बंध लादण्यात आले ते योग्य होते का? आज आम्ही मास्क न वापरणे हे पुरुषार्थाचे लक्षण समजतो! शारीरिक व सामाजिक अंतराचा तर बट्ट्याबोळ उडाला आहे. आज ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती करण्यात आली आहे ती योग्य आहे का? वारंवार सॅनिटायझर वापरणे कितपत योग्य आहे? अशा अनेक प्रश्नांमुळे डोके बधिर झाले आहे! कोरोना प्रतिबंधासाठी आतापर्यंत लसी तयार करण्यात आल्या आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका सातपटींनी कमी होतो असे अमेरिकेतील एका अभ्यास पाहणीत आढळले आहे. मॉडर्नाची लस ही फायझर आणि जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसींपेक्षा कोरोनाच्या डेल्टा उपप्रकारावर जास्त प्रभावी आहे म्हणे. या लसीमुळे कोरोना झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.

गंभीर आजारपण टाळण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी लसींचा वापर करण्याची गरज आहे. फायझरने बायोएनटेकच्या मदतीने तयार केलेली लस ५ ते ११ वर्षे वयोगटासाठी परिणामकारक व सुरक्षित असल्याचे चाचण्यांत दिसून आले आहे. ही लस दिलेल्या मुलांमध्ये कोविड-१९ विषाणूला निष्प्रभ करणारी प्रतिपिंडे तयार झाली. त्यामुळे आता फायझरच्या लसीचा मुलांसाठी वापर करण्याकरिता आपत्कालीन परवानगी मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ ते ११ वयोगटातील मुलांना १० मायक्रोग्रॅमच्या दोन मात्रा दिल्या असता त्यांच्यात चांगला परिणाम दिसून आला. प्रतिपिंडेही चांगल्या प्रमाणात तयार झाली. या वयोगटात लस सुरक्षित, सुस व परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे अशा अभ्यासापेक्षा दुसराच अभ्यास अधिक होतो असे दिसून आले आहे.

कोरोनाबाबत दिशाभूल करणारी सर्वांत जास्त गैरमाहिती भारतात प्रसारित झाली आहे. म्हणजे कोरोनाबाबत समाजमाध्यमातील चुकीच्या माहितीत भारत आघाडीवर आहे. कारण देशात इंटरनेटची पोहोच मोठ्या प्रमाणात आहे. देशात समाजमाध्यमातील आशयही मोठ्या प्रमाणात वाचला व बघितला जातो. इंटरनेट साक्षरतेच्या अभावानेही ही स्थिती वाढत गेली. लोकांनी चुकीची माहिती पसरवली असे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे. भारतात समाजमाध्यमावर सर्वाधिक गैरमाहिती पसरवण्यात आली याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आता भारतात इंटरनेटची पोहोच वाढली आहे. त्यामुळे लोक समाजमाध्यमाचा जास्त वापर करतात. त्याचबरोबर इंटरनेट साक्षरतेचा अभाव असल्याने कुठल्या आशयावर विश्वास ठेवायचा, कुठल्या नाही याबाबत लोकांत समजच नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधात म्हटले आहे की, कोरोनाबाबतच्या गैरसमजुतीला बळी पडू नका. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. समाजमाध्यमातून येणा-या माहितीची तपासणी करणे गरजेचे आहे. माहितीचा स्रोत काय आहे यावर माहितीची विश्वासार्हता अवलंबून असते. त्यामुळे स्रोत तपासणे गरजेचे आहे. कोरोनाबाबत जगभरात जे वेगवेगळे निष्कर्ष जाहीर होत होते त्यामुळेही लोकांची द्विधा मन:स्थिती झाली हे ही मान्य करावयास हवे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या