जगातील महाशक्ती मानल्या जाणा-या अमेरिकेत कोरोना महामारीमुळे सुमारे पाच लाख बळी गेले आहेत. पहिल्या दोन जागतिक महायुद्धांत आणि व्हिएतनाम युद्धातील एकूण बळींपेक्षा ही संख्या अधिक आहे. त्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. बायडन यांचा कोरोनाविषयक दृष्टिकोन माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळा आहे. ट्रम्प यांना कोरोनाच्या परिणामाचे गांभीर्यच नव्हते. त्यांनी मास्क वापरण्यास नकार दिला होता आणि कोरोना प्रतिबंधक अन्य उपायांनाही विरोध केला होता. नंतर कोरोनाने ट्रम्प यांनाच घेरले तेव्हा त्यांनी मास्क वापरणे सुरू केले. अमेरिकेत सुमारे २८ दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. व्हाईट हाऊसमध्ये मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष बायडन उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात कुणीही त्यावर राजकारण करू नये असे आवाहन केले होते. अशा आवाहनाचा भारतीयांवर काहीही परिणाम होत नाही. कारण आमच्या नसानसात राजकारण भरले आहे. परिस्थिती कितीही गंभीर असो त्यात आपली पोळी कशी लाटता येईल तेच आम्ही पाहतो. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायलाही आम्ही मागे-पुढे पाहत नाही.
भूकंप, महामारी, दुष्काळ या प्रसंगी अनेकांना याचा अनुभव आला असेल. योगगुरु रामदेवबाबा अशा प्रसंगी मागे कसे राहतील? योगाद्वारे भारतीयांना दीर्घायुरारोग्य प्रदान करणा-या रामदेवबाबांचा आधीच बारीक आणि लवलवणारा एक डोळा कोरोना महामारीच्या कालावधीत आणखीनच बारीक झाला. जडी-बुटीच्या आधारे ‘पतंजली’चे साम्राज्य निर्माण करणा-या बाबांनी कोरोनाचा समाचार घेण्याचे ठरवले. जगभरात कोरोनावर रामबाण लस शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. कोरोनाविरुद्धच्या युद्धात रामदेवबाबांनी ‘कोरोनिल’ हे औषध घेऊन उडी घेतली. गतवर्षी २३ जून रोजी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ‘कोरोनिल’ नावाचे इम्युनिटी बुस्टर बाबांनी बाजारात आणले. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर हे औषध कोरोनावर मात करू शकत नसल्याचे आणि केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारे आहे असे पतंजलीने जाहीर केले होते. एकदा हार झाली म्हणून हार मानणार ते बाबा कसले? ते वेताळासारखे कोरोनाच्या मागेच लागले. पतंजलीने कोरोनिल टॅब्लेट ही गोळी बाजारात आणली. या आयुर्वेदिक औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निर्देशानुसार भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मंजुरी दिल्याचा दावा योगगुरूंनी केला. मात्र संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकृत ट्विटमध्ये हा दावा फेटाळण्यात आला आणि रामदेवबाबांनी रपटी खाल्ली.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून पतंजलीच्या ‘कोरोनिल’ची जाहिरात करण्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. कोरोनिल या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने हिरवा कंदिल दाखवल्याचा ‘पतंजली’चा दावा धादांत खोटा आहे. हे औषध परिणामकारक असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने केली आहे. या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणनानुसार मान्यता दिल्याचा दावा रामदेवबाबांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ कंपनीने १९ फेब्रुवारी रोजी केला होता. गत आठवड्यात रामदेवबाबा यांच्या कथित कोरोना औषध उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्वत: डॉक्टरची पदवी घेतलेले हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. हे मंत्रीद्वय कथित औषध अनावरण कार्यक्रमास केवळ उपस्थित होते असे नाही तर ते अप्रत्यक्षपणे या औषधाच्या खोट्या प्रचारात सामील झाले हेच स्पष्ट होते! खरे तर दोन्ही मंत्र्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवावयास हवा होता. आरोग्यमंत्री स्वत: डॉक्टर आहेत.
अॅलोपॅथीची औषधे सर्व चाचण्यांमधून तावून-सुलाखून निघालेली असतात. तरीही त्यांनी जडीबुटींवर कसा काय विश्वास ठेवला? याचा अर्थ आयुर्वेदाची सारी औषधे कुचकामी असतात असे नाही. काही औषधे तर काही रोगांवर अत्यंत गुणकारी आहेत. आपल्या पूर्वजांचे प्राचीन ज्ञान तकलादू नाही पण त्या औषधांच्या शास्त्रीय कसोट्यांवर चाचण्या न घेतल्यामुळे त्याचे ठोस परिणाम दिसत नाहीत. ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ते अॅलोपॅथीची कास धरतात पण ज्यांच्याकडे देशभक्तीच्या श्रद्धेने भरलेले मन आहे ते जडीबुटीच्या मागे लागतात.‘कोरोनिल’ हे कोरोना निर्मूलनावर गुणकारी असेल तर आरोग्य मंत्रालयाने ते देशभर तातडीने पोहोचवावयास हवे. तसे झाल्यास नाकाबंदी , संचारबंदी, गर्दीवर नियंत्रण, मुखपट्टी, सोशल डिस्टन्स आदीतून जनतेची सुटका होईल. लसीकरणावरील नाहक खर्च कमी होईल आणि देशाची घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल. अर्थसंकल्पातील ‘सबका विकास’ हे स्वप्नही पूर्ण होऊ शकेल.
आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल’ असे म्हटले जाते. कारण पुरेशा संशोधनाशिवाय आधुनिक औषधे बाजारात आणता येत नाहीत. पण केंद्रीय मंत्रीच अशास्त्रीय औषधे कुरवाळण्यात धन्यता मानत असतील तर काय बोलणार? काही महिन्यांपूर्वी आयुर्वेदाच्या नावाखाली विकले जाणारे च्यवनप्राशही भेसळयुक्त निघाले म्हणे, त्यात नामवंत ब्रँडच्या कंपन्याही होत्या! ‘कोरोनिल’ला आपण कसलेही शिफारसपत्र दिले नसल्याचा खुलासा डब्ल्यूएचओने केला आहे. त्यामुळे योगगुरूंचा असत्ययोग दुस-याच दिवशी शीर्षासनासारखा उलटा पडला !