28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसंपादकीयवेगाचे बळी

वेगाचे बळी

एकमत ऑनलाईन

जग झपाट्याने बदलतेय. या गतिमान जगात जो थांबला तो संपला हे खरे आहे. धावत्या जगाबरोबर आपल्यालाही सुसाट वेगाने धावावे लागणार आहे. परंतु हा सुसाट वेगच आपल्या जिवावर घाला घालतोय. ४ सप्टेंबर रविवार हा दिवस उद्योग जगतासाठी ‘काळा दिवस’ ठरला. शापूरजी पालनजी उद्योग घराण्याचे वारसदार, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथे कार अपघातात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. या दुर्घटनेत त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर पांडोल यांचाही मृत्यू झाला. डॉ. अनायता पांडोल कार चालवीत होत्या. त्यांच्यासह त्यांचे पती दरियस पांडोल हे गंभीर जखमी झाले आहेत. सायरस मिस्त्री पांडोल कुटुंबीयांसह अहमदाबाद येथून मुंबईकडे मर्सिडीज कारमधून येत होते. चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पांडोल यांचा मृत्यू झाला.

सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग विश्वात हळहळ व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींनी शोक व्यक्त केला आहे. कारमधील चौघेही गुजरातमधील उदवाडा येथे देवदर्शनासाठी गेले होते. वलसाड जिल्ह्यातील उदवाडा हे पारसी समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. हिंदू धर्मियांसाठी काशी हे जसे पवित्र स्थान तसे उदवाडा हे पारसी समुदायासाठी पवित्र स्थान मानले जाते. सायरस मिस्त्री यांच्या जाण्याने शापूरजी पालोनजी समूहाला जबरदस्त धक्का बसला आहे. सुमारे ३० अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या या समूहाची टाटा समूहात १८.६ टक्के भागीदारी आहे. पालोनजी कंपनीची स्थापना १८६५ मध्ये सायरस यांचे आजोबा वरिष्ठ पालोनजी मिस्त्री यांनी केली होती. सायरस यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे २८ जून २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर सायरस यांच्या निधनामुळे यंदाच्या वर्षात पालोनजी समूहाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का. जन्माने आयरिश नागरिक आणि शापूरजी पालोनजी समूहाचे वारस सायरस हे समूहाचे प्रमुख होते.

वयाच्या ४४ व्या वर्षी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. एवढ्या लहान वयात त्यांनी टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांची जागा घेतली होती. टाटा सन्सची सूत्रे घेण्यास मिस्त्री नाखुश होते, अशीही चर्चा होती परंतु रतन टाटा यांनीच त्यांना हे आव्हान स्वीकारण्यास राजी केले होते. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये अचानक त्यांना पदावरून हटविण्यात आले. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले असे बोलले जाते. मतभेदानंतर रतन टाटा यांनी काही काळ अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. नंतर एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात आले. शापूरजी पालोनजी ही देशातील सर्वांत जुनी आणि विश्वासार्ह बांधकाम कंपनी आहे. या समूहात सुमारे २५ हजार कर्मचारी आहेत. या समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जलऊर्जा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे. समूहात १८ कंपन्या आहेत. सुमारे ५० देशांत त्यांचा व्यवसाय आहे. या समूहाने आशिया खंडात लक्झरी हॉटेल्स, स्टेडियम आणि कारखाने बांधले आहेत. सायरस मिस्त्री यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले.

नंतर १९९० मध्ये लंडन विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग केले. त्यानंतर १९९६ मध्ये लंडन विद्यापीठातून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यांचा विवाह रोहिता छागलाबरोबर झाला असून त्यांना फिरोज व जहान अशी दोन मुले आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर सायरस यांनी आपल्या सन्मानासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्यात त्यांना कधी दिलासा मिळाला तर कधी पदरी निराशा आली. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली. सायरस यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्झरी गाड्यांची सुरक्षा, त्यांचा वेग आणि इतर बाबी आता केंद्रस्थानी असताना लक्झरी गाड्या सुरक्षित आहेत का? दोनपेक्षा जास्त एअरबॅग असूनही सायरस यांचा जीव का वाचू शकला नाही ? कार अपघातात एअरबॅग महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात हायवे आणि एक्स्प्रेसवेवर वाहनांचा वेग किती असावा याच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही वेग मर्यादा ताशी २४० कि. मी. आहे. अपघाताचे प्रमुख कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सध्या तरी अतिवेगामुळे हा अपघात घडला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. मिस्त्री यांची कार १२५ ते १५० च्या वेगाने जात असावी. कारण कारने ९ मिनिटांत २० कि. मी. अंंतर पार केल्याचेही बोलले जात आहे. दुसरे म्हणजे कार घसरली असावी किंवा कोणाला तरी वाचविण्याच्या नादात किंवा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा. संरक्षक उपायांकडे दुर्लक्ष झाले असावे, अशीही शंका आहे. रस्ता तयार करताना कोणत्या संरक्षक उपाययोजना कराव्यात याबाबत इंडियन रोड काँग्रेसच्या स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार पुलाच्या लोखंडी किंवा काँक्रिट कठड्याआधी तुटण्यायोग्य असा संरक्षण अडथळा (बॅरिअर) बसविणे आवश्यक असते. त्यामुळे मोटारीचा वेग कमी होऊन प्रवाशांचे प्राण वाचू शकतात. परंतु मोटारीच्या धडकेची तीव्रता कमी करणारा अभियांत्रिकी उपाय केला नसल्याने या अपघाताची तीव्रता वाढली आणि मिस्त्री यांच्यासह दोघांना प्राण गमवावा लागला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोड ते अच्छाड या ५२ कि. मी. रस्त्यावर गत दीड वर्षात ९६ पेक्षा अधिक अपघात झाले असून १०६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर ४९ प्रवासी कायमचे अपंग झाले आहेत.

या महामार्गावर मेंढवण घाट, सोमठा, चारोटी उड्डाण पूल, आंबोली येथे तीव्र वळणे आहेत. ही ठिकाणे मृत्यूचे सापळे बनले आहेत. काही दिवसांपासून मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गही अनेक अपघातांना कारणीभूत ठरला आहे. आता तेथे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. रस्ते अपघात ही अलीकडे खूप मोठी समस्या बनली आहे. गत वर्षी देशात रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशात दररोज ४२६ तर दर तासाला १८ जण मरण पावतात, असा एनसीआरबीचा अहवाल आहे. यावरून देशात वाहन चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे हेच लक्षात येते. देशात सर्वाधिक सुमारे ३३ हजार अपघात उत्तर प्रदेशमध्ये झाले तर सर्वांत कमी अपघात मिझोरममध्ये झाले. तेथे ६४ अपघातांत तितक्याच व्यक्ती मरण पावल्या. वेगावर नियंत्रण ठेवले तरच आपण वेगवान जगाबरोबर धावू शकतो हेच खरे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या