22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसंपादकीयपाणी संकट !

पाणी संकट !

एकमत ऑनलाईन

आजवर देशातील पाणी संकट आणि ते दूर करण्यासाठीच्या योजना यांचे अनेक वेळा नित्यनियमाने चर्वितचर्वण झालेले आहे. जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या चर्चा रंगतात, त्यावरून जोरदार ओरड होते मग पाण्याचा काटकसरीने वापर व पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन कसे आवश्यक आहे याबाबत मोठमोठ्या घोषणाही होतात. त्यातून कधी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अशी योजना जन्माला येते तर कधी नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार वगैरेंसारख्या असंख्य योजना जन्माला येतात. त्यातल्या काही कार्यान्वितही होतात पण बहुतांश पावसाळ्याच्या पाण्यासोबत वाहून जातात. थोडक्यात एकदा पावसाला सुरुवात झाली की जनतेला व नियोजनकर्त्यांनाही पाणीटंचाईच्या समस्येचे विस्मरण झालेले असते आणि त्याची आठवण थेट उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाई निर्माण झाल्यावरच होते ! त्याच्या परिणामी या समस्येवर गांभीर्याने विचारही होत नाही, की समस्या मुळातून दूर करण्याचे ठोस प्रयत्नही होत नाहीत.

हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागणे, वणवण करावी लागणे आदी बाबी मग जनतेचे प्राक्तनच बनते. पाणीटंचाईचे हे संकट कमी म्हणून की काय, आताशा त्यात उपलब्ध पाण्याच्या वाटपातील ढिसाळ नियोजन, बेपर्वाई व हलगर्जीपणा यांसारख्या समस्यांची भर पडली आहे. साहजिकच त्यामुळे पाणी हा ही राजकीय पक्षांसाठी राजकारण तापविण्याचा मुद्दा बनला आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागासाठी तर पाणीटंचाई ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, जेव्हा प्रकल्पांमध्ये पाणीसाठा असतो तेव्हाही जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावेच लागते कारण या पाणीपुरवठ्याच्या योजनांमध्ये त्या तोकड्या असण्यापासून जीर्ण होण्यापर्यंतच्या कैक मानवी समस्या निर्माण झालेल्या आहेत. लोकसंख्या वाढतेच आहे, शहरांचे आकारमानही वाढतेय पण त्यानुसार पाणीपुरवठा योजनांची क्षमता वाढलेली नाही, हे शहरी भागातील चित्र तर गावखेड्यात पाणीपुरवठा योजनाच अस्तित्वात नसणे किंवा असल्या तरी त्या बंद अवस्थेत असणे, असेच चित्र दिसते. निवडणुकांचा मोसम आला की, राजकीय पक्ष त्यावर वारेमाप बोलतात व आश्वासनांचा पाऊसही पाडतात. मात्र, त्याचे पुढे काय होते? याचा थांगपत्ता अद्याप तरी जनतेला लागलेला नाही.

सत्ताधा-यांनी पाणीटंचाईसाठी निसर्गाकडे बोट दाखवायचे आणि विरोधकांनी त्यावर राजकीय आरोपांच्या फैरी झाडायच्या याशिवाय दुसरे काहीही होत नाही! देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अमृतमहोत्सव थाटात साजरा करताना जीवनावश्यक असणा-या पाण्यासाठी लोकांना जीव गमवावे लागत असतील तर मग आपण मागच्या ७५ वर्षांत या देशात केले तरी काय? हाच यक्ष प्रश्न! घरातील नळाला पाणीच येत नाही म्हणून कुटुंबाला कपडे धुण्यासाठी पाणवठ्यावर जाण्याची वेळ येते आणि हा पाणवठाच त्या कुटुंबाचा बळी घेतो यासारखी हृदयद्रावक व क्लेशदायी दुसरी घटना तरी कोणती? कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागाची ही स्थिती! तर ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातल्या गावचे लोक पाणी आणण्यासाठी हक्काची माणसे पाहिजेत म्हणून अनेक लग्नं करतात. महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे मुली लग्न करून तेथे जायला तयार नसतात आणि समजा गेल्याच तर त्यांची लग्ने टिकत नाहीत. रात्री विहिरीत जमा होणारे पाणी मिळविण्यासाठी महिलांना अंधारातच जीव धोक्यात घालत विहिरीत उतरावे लागते आणि या जीवघेण्या कसरतीची छायाचित्रे व बातम्या नित्यनियमाने प्रसिध्द होतात पण आपल्या निगरगट्ट व्यवस्थेची गेंड्याच्या कातडंीलाही लाजवणारी कातडी काही केल्या थरथरत नाहीच! पाणीटंचाई ही नैसर्गिक समस्या आहे हे मान्यच! मात्र केवळ तेच कारण आहे हा दावा अर्धसत्यच ! या वर्षी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला.

अनेक भागांना तर अतिवृष्टीचा तडाखाही सहन करावा लागला. सगळ्याच प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असूनही अनेक शहरांना आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसाला पाणी मिळते. गावखेड्यातील प्रकल्प वा जलस्रोतांमध्ये पाणी आहे पण ते गावांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थाच ठप्प म्हणून पाणीटंचाई ! हा काय आता निसर्गाचा दोष आहे का ? मुळात सततच्या पाणीटंचाईवर उपाय करण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी निसर्गाला बोल लावण्याचा हा खेळ अजीर्ण होईपर्यंत खेळून झाल्यावरही नियोजनकर्ते सुधारण्यास तयार नाहीत ही खरी समस्या आहे. त्यामुळे पाणीटंचाई ही निसर्गाची अवकृपा व त्यासोबत नियोजनाचा अभाव यामुळे आहे त्यापेक्षा कैक पटींनी आक्राळविक्राळ बनलेली आहे हे पूर्ण सत्य ! आता हे सत्य स्वीकारून त्यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे अन्यथा अगोदरच्या धोरण चुकांमुळे पाण्यावरूनच शहरी व ग्रामीण, महानगरे व शहरे आणि उद्योगांसाठीचे पाणी व शेतीसाठीचे पाणी असे नवे संघर्ष राज्यात उफाळून येण्याची शक्यता बळावत चालली आहे.

निसर्गच त्यावर उपाय काढेल, हा आता भाबडा आशावाद ! निसर्ग त्याच्या क्षमतेने भरभरून देतोय पण निसर्गाला ओरबडणा-या मनुष्यप्राण्याची भूक सदोदित वाढतीच आहे. शिवाय ही भूक भागविण्यासाठी योग्य नियोजन करण्याची व निसर्गाला हानी न पोहोचविण्याची दक्षता घेण्याचीही मनुष्यप्राण्याची तयारी नाहीच ! मात्र दोष सगळा निसर्गावर ! देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक गाव, शहर, महानगर हे पाण्याच्या आपल्या गरजेबाबत स्वयंपूर्ण असले पाहिजे, असे नियोजन करण्याची इच्छाशक्ती सर्वपक्षीय राज्यकर्त्यांमध्ये जागी होत नाही, ही खरी समस्या आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न स्वत:पासून सुरू करण्यास कुणीच तयार नाही.

मात्र सगळे दुस-याचे दोष दाखवून देण्यासाठी सरसावलेले! अशा स्थितीत मग पाण्यावरूनही राजकारण रंगणे व तहानलेल्या जनतेला ते असहायपणे पाहात राहावे लागणे अटळच ! पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या समस्येस कारणीभूत ठरणा-या प्रत्येक बाबीवर गांभीर्याने एकत्रित उपाययोजना होणे हाच पर्याय आहे. वर्षागणिक पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असतानाही जर आपण त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नसू तर मग पाण्यासाठीचे टाहोही थांबणार नाहीत की पाणीटंचाईचे बळीसत्रही थांबणार नाही हे निश्चित !

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या