24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसंपादकीयकिलबिलाटाचे स्वागत!

किलबिलाटाचे स्वागत!

एकमत ऑनलाईन

बुधवारी (१५ जून) ज्ञानमंदिरात पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला ही अत्यंत आशादायक अन् आनंददायक गोष्ट. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या बालगीतात थोडासा बदल करून ‘किलबिल किलबिल मुले बोलती’ असे म्हणता येईल. कारण परिस्थितीच तशी बनली होती. कोरोना महामारीमुळे राज्यात गत वर्षभरात सुमारे २५ हजार मुले शिक्षणापासून वंचित राहिल्याचे आढळून आले होते. त्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकारानुसार या सर्व शाळाबा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची मोहीम राबविण्याची जबाबदारी सरकारवर आली. शासनही त्यादृष्टीने प्रयत्न करताना दिसले ही चांगली गोष्ट. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे शाळा नियमित सुरू राहू शकल्या नाहीत. या काळात स्थलांतराचे प्रमाणही वाढले होते.

त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबा मुले यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरक्षक’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्या आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे आढळून आले. काही ठिकाणी सोमवारपासून (१३ जून) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळाबा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. शाळाबा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांनी अनेक प्रयत्न केले.

शासकीय शाळांत विद्यार्थीसंख्या कमी असते. या शाळांतील शिक्षक खेडोपाडी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. खासगी शाळांतील शिक्षकही प्रयत्नशील होते. कारण अलीकडे खासगी शाळांतील पटसंख्या कमी होत चालली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या शाळांचे वाढलेले शुल्क. आकर्षक इमारती, गणवेश आणि इंग्रजीचे आकर्षण यामुळे पालकांचा ओढा अजूनही खासगी शाळांकडे असला तरी वाढत्या शैक्षणिक शुल्कामुळे हा ओढा आता शासकीय शाळांकडे वळू लागला आहे. खासगी शाळा आधुनिक शैक्षणिक साधनांनी सज्ज असतात. तज्ज्ञ व कुशल शिक्षकवृंद, सीसीटीव्हीने सज्ज क्लासरूम, कलरफुल क्लासरूम, योगा व नृत्यासाठी स्वतंत्र क्लास अशा त्यांच्या जाहिराती असतात. पण शिक्षण ही प्रक्रिया या देखाव्यापलिकडील आहे याची जाणीव पालकांना होऊ लागली आहे. ही जाणीव टिकवणे हे खरे आव्हान आहे. अजूनही ब-याच शासकीय शाळा पायाभूत सुविधांबाबत मागे आहेत. स्वच्छतागृहे आहेत पण तेथे दारे नाहीत, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही, संगणक आहेत पण वीज नाही अशी स्थिती असल्यानंतर या शाळांकडे विद्यार्थी वळतील कसे? तरीसुद्धा पूर्वीपेक्षा आज शासकीय शाळांची प्रकृती सुधारली आहे असे म्हणता येईल.

आता गरज आहे ती तिला योग्य टॉनिक देण्याची. राज्यात १३ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आव्हान स्वीकारावे लागले मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा ऑफलाईन वर्ग सुरू होत आहेत. कोरोना स्थिती आटोक्यात असली तरी काही कोविड प्रोटोकॉल पाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी फुले, चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले. सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. पण विदर्भात अजूनही उष्णतेची लाट सुरू आहे म्हणून त्या भागातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन गणवेश,नवे मित्र, नवे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. पहिल्या दिवशी मुलांच्या किलबिलाटामुळे शाळा गजबजून जाते. गत दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस अनुभवता आला नव्हता. यंदा मात्र शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. काही शाळांची प्रवेशद्वारे फुगे-फुलांनी सजली होती. लेझिम, ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना वही-पेन देण्यात आली. काही ठिकाणी नवी पुस्तकेही देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुबक रांगोळ्या अन् स्वागतपूर्ण संदेशही होते. कुठे फुले देऊन तर कुठे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले.

ही सारी किमया कोरोना महामारीची! जुन्या पिढीला अशा स्वागताचा अनुभव कधी मिळालाच नाही. त्यांचे स्वागत ‘छडी लागे छम्छम्’नेच व्हायचे! १४ जूनला वटपौर्णिमा होती. ‘सात जन्म हाच पती मिळावा’ म्हणून महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. पण खेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी ‘सात जन्म शिक्षक बनून मुलांना ज्ञानार्जन करण्याचे भाग्य मिळावे’ यासाठी शाळेच्या आवारातील शिरीषाच्या झाडाची पूजा करून, फेरे घालून आगळी-वेगळी शिरीष पौर्णिमा साजरी केली म्हणे! विद्यार्थिदशेतूनच माणूस घडत असतो. लहान मुले चिखलाच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना जसा आकार द्याल तशी ती घडत जातात. चांगले शिक्षक असतील तर विद्यार्थीही चांगलेच घडतील. सुसंस्कृत, सर्वगुणसंपन्न, ज्ञानसंपन्न शिक्षक असणे ही आजच्या युगाची गरज आहे. गत दोन वर्षांत शैक्षणिक कामकाज ऑनलाईन होऊनही ३१ टक्के शिक्षक अजूनही डिजिटल साधने वापरण्यात सक्षम नसल्याचे आढळून आले आहे. शिक्षणाचे कामकाज अचानक ऑनलाईन झाल्याने सुमारे ७९ टक्के शिक्षक सरावाने किंवा शिकून घेऊन त्याचा वापर करू लागल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पारंपरिक अध्ययन-अध्यापन पद्धतीसह शिक्षणामध्ये डिजिटल साधनांचा वापर आता वाढत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना डिजिटल साधने वापरण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या