‘ती’ सध्या काय करते? असा प्रश्न विचारणा-याला, ‘ती’ सध्या काय करीत नाही? असा प्रतिप्रश्न करावा लागेल. ‘एक सवाल मै करूँ एक सवाल तुम करो, हर सवाल का सवाल ही जवाब हो’ असे हे कोडे आहे. मजेची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नातच त्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. मात्र ते समजण्याची, समजून घेण्याची मनाची तयारी असली पाहिजे. तशी ती नसेल तर आता ती करून घ्यावी लागेल! कारण आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. आता असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. महिला आता ‘अबला’ राहिलेल्या नाहीत तर त्या ‘सबला’ बनल्या आहेत. आता त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्याकडे कुत्सितपणे पाहण्याची दृष्टी पुरुषवर्गाला बदलावीच लागेल. वर्षानुवर्षे त्यांच्यावर अन्याय झाला हे खरे आहे. वर्तमानात स्त्री-पुरुष समानता संकल्पना उत्तम पद्धतीने समाजात रुजत चालली आहे. तरीही महिलांना व्यक्तिगत, कुटुंब आणि सामुदायिक पातळीवर सन्मानपूर्वक वागणूक मिळावी ही अपेक्षा आहे. महिला आपल्या स्वकर्तृत्वावर स्वत:चा विकास साधू शकतात यात शंका नाही.
अनेक वर्षांपासून जगभरात ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यामागची संकल्पना एका कामगार आंदोलनातून साकार झाली. १९०८ मध्ये १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. याशिवाय चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा अशाही मागण्या होत्या. वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने ८ मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यामागची कल्पना सुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लास जेटकीन या महिलेने कोपनहेगेनमध्ये महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, त्या परिषदेत १७ देशांच्या १०० महिला सहभागी झाल्या होत्या. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता दिली. पहिल्या जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य होते, ‘भूतकाळाचा आनंद, भविष्यकाळासाठी योजना!’ (सिलेब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर) जगाच्या पाठीवर सर्वच देशांत महिला दिन साजरा केला जातो. पण गत शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत महिलांना साधा मतदानाचा अधिकारसुद्धा नव्हता. नंतर त्यांना तो मिळाला.
परंतु मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे सारे काही झाले असे नाही. आज सुमारे शतकभरानंतरही महिलांना समाजाच्या सर्व क्षेत्रात ज्या प्रमाणात सक्रिय होणे अपेक्षित होते तो स्तर गाठता आलेला नाही. केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्व देशांत राजकारणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूपच कमी आहे. ठराविक देश वगळता अनेक देशांचे नेतृत्व आजपर्यंत महिलांनी केलेले नाही. भारतात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, त्यांनी अंतराळातही झेप घेतली आहे अशी उदाहरणे दिली जातात परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. विधानसभा अथवा लोकसभेतील महिलांच्या संख्येवरून ते लक्षात येईल. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले असले तरी लोकसभा किंवा विधानसभेमध्ये अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण नाही. राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर उमेदवारी देताना महिलांना प्राधान्य देऊ शकतात. या पक्षांनी महिलांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारी दिली तर आपोआपच लोकसभा आणि विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढू शकते.
परंतु अशी इच्छाशक्ती कोणताही राजकीय पक्ष दाखवत नाही. मात्र, पुरागामित्वाच्या नावाखाली महिलांसाठी आम्ही काय करतो ते सांगण्यासाठी व्यासपीठ गाजवायला सारे मोकळे! खासगी क्षेत्रामध्ये मात्र महिलांचा प्रभाव वाढतो आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. शासकीय सेवांमध्येही महिलांचा सहभाग वाढत आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. सामाजिक स्तरावर मात्र लिंगभेद अजूनही अस्तित्वात आहे. काही क्षेत्रामध्ये महिलांचे महत्त्व वाढत असताना देशातील अनेक भागात गर्भलिंग चाचणी करून भ्रूणहत्या करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चुकीच्या परंपरा आणि रूढींच्या जोखडात जखडलेल्या भारतीय समाजाने अद्यापही वैवाहिक परंपरा, धार्मिक परंपरा यात महिलांना स्वातंत्र्य दिल्याचे दिसून येत नाही. जोपर्यंत अर्ध्या जगाचे प्रतिनिधित्व करणा-या या महिलांना नैसर्गिकपणे आणि मनापासून सन्मान दिला जाणार नाही तोपर्यंत महिला शक्तीला आपला लढा चालूच ठेवावा लागणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. महिला आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावतात. कधी आई आणि कधी बहीण म्हणून तर कधी पत्नीच्या रूपात.
बदलत्या काळानुसार हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. महिलांचा सन्मान करून त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाक्षणांची साथ! स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व! उत्तुंग तुझ्या भरारीपुढे गगन हे ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखांखाली अवघे विश्व वसावे! आईच्या वात्सल्याला सलाम, बहिणीच्या प्रेमाला सलाम, मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम. प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे, याच हार्दिक शुभेच्छा! खंत एकच, आजच्या काळातही महिला, मुली असुरक्षित आहेत हे कटू वास्तव आहे.
जगभर महिला दिन दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिला सबलीकरण, सक्षमीकरण याचे गोडवे गायले जातात, ती प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवते म्हणून महिलेचा गौरव होतो, मानसन्मानाने कौतुक केले जाते. मात्र, त्याचवेळी दरदिवशी ‘ती’ कुठल्या ना कुठल्या अत्याचाराचा बळी ठरते. ‘ती’ अजूनही असुरक्षितच आहे हे आजचे वास्तव आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्भया फंड जमा केला, बालगुन्हेगारी कायद्यात बदल केला, अनेक कायदे अधिक कठोर केले. बळी जाणारी ‘ती’ कोणाची तरी बहीण, मुलगी, आई, पत्नी असते तर अत्याचार करणारा समाजातील कोणीतरी मानसिक विकृतीचा नराधम असतो. मानसिक विकृती बदलली तरच ‘ती’ सुरक्षित राहील. नाहीतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या केवळ घोषणाच राहतील.