36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसंपादकीयराजकारणाच्या किड्यावर औषध काय?

राजकारणाच्या किड्यावर औषध काय?

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, राज्यातील शहरी व महानगरी भागातील रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या औषधी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साहजिकच परंपरेप्रमाणे रेमडेसिविरचा काळाबाजार पूर्ण जोमात सुरू आहे व त्याद्वारे काही मंडळी व्यवस्थित आपले उखळ पांढरे करून घेते आहे तर दुसरीकडे या सगळ्यावरचा रामबाण उपाय म्हणून राज्य सरकारने टाळेबंदी लावत आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडली आहे आणि ‘बंद सम्राट’ प्रशासन कार्यतत्परतेचा कळस गाठत ‘कठोर निर्बंधां’ची ढाल वापरत सर्व काही ‘कडकडीत बंद’ करण्यात मग्न आहे.

लॉकडाऊन केल्याने कोरोनाही लॉकडाऊन होतो, हा समज शास्त्रीय पातळीवर गैरसमज ठरून त्यावरून एकदा तोंडघशी पडण्याचा अनुभव पुरेपूर मिळूनही शासन-प्रशासन मात्र हाच कोरोनावरचा उपचार हा आपला हट्ट सोडायला काही तयार नाहीच. त्याची विविध दृश्य व अदृश्य कारणे असू शकतात. प्रमुख दृश्य कारण म्हणजे टाळेबंदी केली की, शासन-प्रशासन म्हणून आपले इतिकर्तव्य पार पाडल्याचा स्थायीभाव, तर प्रमुख अदृश्य कारण म्हणजे टाळेबंदीने सरकारला अडचणीच्या ठरणा-या मुद्यांना व्यवस्थित बगल देता येते. असो! नेमका हेतू काय हे शासन-प्रशासनालाच ठावूक पण यामुळे सर्वसामान्य जनतेची दुहेरी होरपळ होते आहे. टाळेबंदीने सामान्यांसमोर अर्थसंकट उभे केले आहे आणि ते झेलतच त्यांना आरोग्य संकटाचाही सामना करायचा आहे. खरे तर कोरोनाने आता आपल्याला वर्षभराचा अगाध अनुभव दिला आहे.

या अनुभवाने जसे शासन-प्रशासन संपन्न झालेय तशीच जनताही अनुभवसंपन्न झालीय. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे स्वयंशिस्त आणि हाती आलेल्या लसीच्या आयुधाचा नियोजनपूर्वक सुयोग्य वापर हाच दुसरीच नव्हे तर तिसरी, चौथी व कितवीही लाट परतवून लावण्याचा एकमेव उपाय आहे, यावर सर्वांचेच एकमत व्हायला काहीच हरकत नाही. विदेशातील वारंवारच्या लॉकडाऊनची उदाहरणे देऊन आपण जाहीर करत असलेल्या टाळेबंदीचे जोरदार समर्थन करतानाच याच विदेशात लसीकरणाचे आयुध सुयोग्य पद्धतीने वापरून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात लक्षणीय यश प्राप्त होते आहे, याचे सोयीस्कर विस्मरण का होते? हा खरा प्रश्न! हे विस्मरण भारतातल्या राज्यकर्त्यांना व त्यांच्यासोबत सर्वच राजकीय नेत्यांना होते म्हणून भारताला दुर्दैवाने पहिल्या लाटेपेक्षाही जास्त हानीकारक दुस-या लाटेचा सामना करावा लागतो आहे.

अर्धापूर कोव्हिड योद्यांची सुरक्षा रामभरोसे..!

देशावर आलेल्या या संकटातही आपण एकत्रितपणे त्याला भिडलो आहोत हे चित्र वर्षभराच्या अनुभवानंतरही पहायला मिळत नाही, हे दुर्दैवच! हे असे का? तर आपल्या रोमारोमात भिनलेला व उच्छाद घालणारा राजकारणाचा किडा! हा राजकारणाचा किडा काही केल्या मरतच नाही कारण त्यावर औषधच नाही. त्यामुळे तो कोरोनाच्या विषाणूपेक्षाही घातक बनून सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठला आहे. गंमत म्हणजे जगभरातल्या संशोधकांनी दिवस-रात्र एक करून अथक परिश्रमाने कोरोनावर लस शोधून काढल्याने काही कालावधीनंतर का असेना पण कोरोना नक्कीच सर्दी-पडशाप्रमाणे किरकोळ आजार ठरणार आहे. मात्र, राजकारणाच्या किड्यावर लस किंवा औषध शोधण्याचेच प्रयत्न होत नसल्याने त्याचा उच्छाद कसा रोखायचा? हाच देशासमोरचा आजचा कळीचा प्रश्न आहे आणि सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेत होरपळणारी महाराष्ट्रातील जनता केंद्र व राज्य सरकारमध्ये लसीकरणावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत स्वत:ला माखून घेत त्याचा अनुभव घेते आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रकोप थांबवण्यासाठी काय उपाययोजना होणार याकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला पहावे काय लागतेय तर लसीकरणावरून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून लसीकरणच बंद पडण्याचे दिले जाणारे इशारे! हे दावे-प्रतिदावे राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालल्याने व त्यासोबत आलेल्या टाळेबंदीने भेदरलेल्या जनतेचे मनोबल किती उंचावत असतील? हा विचारही लसीकरणावरून राजकारण रंगवणा-यांच्या गावीही नाही, हे दुर्दैवच! निर्माण झालेल्या संकटाच्या स्थितीला एकत्रितपणे भिडून जनतेला दिलासा देण्याऐवजी आपली जबाबदारी झटकण्यासाठीचे आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानली जातेय! आदल्यादिवशी देशात लसीकरणाचा विक्रम झालाय व आपण जगात प्रथम क्रमांकावर आहोत, असा दावा करायचा अन् तो जनतेपर्यंत पोहोचायच्या आतच हा दावा खोडून काढणारा लसीचा प्रचंड तुटवडा असल्याचा प्रतिदावा करायचा व जनतेतील भीतीत भर घालायची. हे एवढ्या सहजपणे फक्त भारतातच घडू शकते कारण इथे ‘राजकारणात सर्व काही माफ आहे’.

विशेष म्हणजे हा धुरळा उडवताना प्रत्येकजण न विसरता ‘कोरोना संकटात राजकारण नको’, असा सल्ला पालुपदाप्रमाणे देतो आणि अप्रत्यक्षरीत्या दुस-यावर राजकारणाचा ठपका ठेवतो. एकदा का हा कलगीतुरा रंगला की, मग मूळ मुद्दाच गायब होतो. सगळेच या धुळवडीत इतरांना माखवायला व स्वत:ही माखून घ्यायला सरसावतात! बरं हे आताच घडतेय असे अजिबात नाहीच! देशात कुठलेही संकट येवो, महापूर येवो, दुष्काळ पडो, भूकंप होवो की आणखी काही. या संकटावरचा अक्सीर इलाज काय? तर आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड! शिवाय ही धुळवड कशावर रंगवावी, याला कसलेच बंधनही नाही आणि मर्यादा तर नाहीच नाही. त्यामुळे याच देशात काही दिवसांपूर्वी संशोधकांनी कोरोनावर शोधलेल्या लसीवरच शंका निर्माण करून तिच्यावर पक्षीय ठप्पे मारून धुळवड साजरी करत जनतेच्या मनात शंका-कुशंका पेरल्या जातात आणि आता हीच कोरोनाची लस मिळत नाही, त्यात दुजाभाव होतोय म्हणून धुळवड साजरी केली जातेय!

मात्र, संशोधकांनी अथक परिश्रमाने शोधलेल्या लसी जनतेपर्यंत वेगाने पोहोचवून कोरोना नियंत्रणाचे सुयोग्य नियोजन करण्याची जबाबदारी कुणाची? या प्रश्नाचे उत्तर मात्र धास्तावलेल्या जनतेला काही केल्या मिळतच नाही. जानेवारीत महाराष्ट्रात व देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली व त्यासोबतच लसीकरणही सुरू झाले. योग्य आकलन करून परस्पर सहकार्याने व एकोप्याने वेगात लसीकरणावर भर दिला गेला असता तर एप्रिलमधली आजची स्थिती उद्भवलीच नसती. मात्र, हे झाले नाही. कारण त्यावेळी परमबीर-वाझे, पूजा चव्हाण-संजय राठोड, कंगणा-अर्णब, धनंजय मुंडे-रेणू शर्मा आदी अत्यंत महत्त्वाच्या विषयांत राज्यातील सत्ताधारी व विरोधक व्यस्त होते तर प. बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीत केंद्रातले सत्ताधारी व त्यांचे विरोधक व्यस्त होते. या राजकारणाच्या किड्यासमोर कोरोना विषाणूकडे लक्ष द्यायला कुणाजवळ वेळच नव्हता व आताही नाहीच. त्यामुळे भडका उडाल्यावरच आता त्यावर उतारा म्हणून आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीचा हा हमखास यशस्वी नाट्यप्रयोग रंगविला जाणे अपरिहार्यच! त्यातून जनतेच्या पदरात काय पडणार? हाच यक्ष प्रश्न!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या