22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसंपादकीयखरं काय, खोटं काय?

खरं काय, खोटं काय?

एकमत ऑनलाईन

सध्या देशात लसीकरण मोहिमेबाबत गोंधळाचे वातावरण आहे. कोविशील्ड अथवा कोवॅक्सिनची पहिली मात्रा घेणा-यांना दुसरी मात्रा घेणे दुरापास्त झाले आहे. याला अनेक कारणे आहेत. लसपुरवठ्यातील अनियमितता, लस वितरणातील गोंधळ त्याला कारणीभूत आहे. पहिली मात्रा घेणा-यांना प्राधान्यक्रमाने दुसरी लस देण्याआधीच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाल्याने पहिली मात्रा घेणा-यांची तगमग सुरू झाली. हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबवले आणि दुसरी मात्रा देण्यास प्रारंभ केला. नियोजनातील गडबड- घोटाळ्यामुळे हे सारे घडले. मुळात पुरेशी लस उपलब्ध झाल्याशिवाय १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे मोफत लसीकरण सुरू करावयास नको होते. राज्य सरकारने थेट लस खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा देण्याची भीमगर्जना केली होती त्याचे काय झाले? लस खरेदीसाठी साडेसहा हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगण्यात आले होते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यानेच ‘लस रामायण’ घडते आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेचे प्राणघातक परिणाम देशभरात जाणवत आहेत. त्यातून संभवणारे आर्थिक व सामाजिक परिणामही अभूतपूर्व स्वरूपाचे आहेत. देशात लसीकरण मोहीम आणि तिचे व्यवस्थापन याचे उदारीकरण केले गेले असले तरी लसींची उपलब्धता आणि त्यातही खासगी क्षेत्र राबवू पाहत असलेल्या लसीकरणासाठी लस मिळविणे खूप आव्हानात्मक बनले आहे. परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करावे अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजारावरील इंजेक्शनचा कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरील एमआरपी कमी करावी. राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत अशी मागणीही राज्य सरकारने केली आहे. राज्यात किमान २० ते २२ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. परदेशातून लस आयात करण्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार झाल्यास त्याचा फायदा राज्यांना होईल.

सध्या अनेक राज्यांकडून जागतिक निविदा काढल्या जात आहेत. परदेशातील लस उत्पादकांकडून राज्यांना वेगवेगळे दर दिले जात आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकेल याची कल्पना राज्यांना आली नसेल, नसता त्यांनी थेट खरेदीच्या वल्गना केल्या नसत्या. आता मात्र त्यांना यातील गोम लक्षात आली असावी. म्हणूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारने राज्याच्या वतीने लस खरेदी कराव्यात अशी सूचना केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एकमेकांशी स्पर्धा करण्याची, भांडणाची वेळ राज्य सरकारांवर आली आहे. या भांडणात ‘भारत’ कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. यामुळे भारताची वाईट प्रतिमा निर्माण झाली आहे. एक देश म्हणून भारताने देशातील सर्व राज्यांच्या वतीने लसी खरेदी कराव्यात. राज्यांनी लस उत्पादन करणा-या देशांशी संपर्क साधण्यापेक्षा भारताने त्यांच्याशी थेट संपर्क साधल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल. अशा देशांशी वाटाघाटी करण्याचे केंद्र सरकारकडे बरेच राजनैतिक मार्ग आहेत असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन

म्हणजे या मार्गातील खाचखळगे आता कुठे राज्यांच्या लक्षात येऊ लागले आहेत. यालाच उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येईल! राज्यातील कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रुग्णसंख्या अजून आटोक्यात आलेली नाही. सध्या राज्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोविशील्डच्या दोन मात्रांमधील अंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत (१२ ते १६ आठवडे) वाढविले आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या नव्या पुराव्यांमुळे कोविशील्डच्या दोन मात्रांमधील अंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढविण्यास लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने परवानगी दिली आहे. आधी हे अंतर सहा ते आठ आठवडे होते. कोवॅक्सिनच्या दोन मात्रांमधील अंतराबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्चमध्ये केंद्र सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमध्ये ४ ते ८ आठवड्यांचा कालावधी असावा असे म्हटले होते. त्यापूर्वी ही मुदत ४ ते ६ आठवडे होती.

‘लॅन्सेट’ने प्रकाशित केलेल्या अभ्यास अहवालानुसार कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचे अंतर असल्यास त्याचा प्रभाव वाढतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता पहिला डोस घेणारे निवांत राहू शकतात. दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागणार नाही. लसीकरणाबाबत सरकारी समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत. कोविड टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यांनी रिकव्हरीच्या तीन महिन्यांपर्यंत लस घेऊ नये असेही समितीने म्हटले आहे. कोविशील्डप्रमाणे फायझर लसीचा दुसरा डोस १२ आठवड्यांच्या अंतराने दिल्यास अ‍ॅन्टीबॉडीजचा प्रतिसाद सुमारे साडेतीन पट अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. खरं-खोटं त्यांनाच माहीत. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने लोकांच्या मनातील एक शंका अशी की लस तुटवडा झाल्याने अंतरामध्ये फेरफार होत असतील का? दोन डोसमधील अंतर वाढविल्याने लसींचा प्रभाव कमी होत नाही असे सांगण्यात आले आहे.

भारत बायोटेकतर्फे कोवॅक्सिन लसीचे उत्पादन केले जात आहे. परंतु या कंपनीच्या ५० कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे म्हणे. त्यावर सोशल मीडियामध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कर्मचा-यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली नव्हती का? असा प्रश्न करण्यात आला आहे. भारत बायोटेक देशातील १८ राज्यांना लस पुरवठा करीत आहे. अमेरिकेत लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांसाठी मास्क लावण्याचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. भारतात मात्र डबल मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशात वर्ष अखेरपर्यंत सर्वांना लस मिळणार आहे म्हणे. कारण ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोसचे उत्पादन होणार आहे… खरं काय, खोटं काय?

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या