21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसंपादकीयदुष्टचक्र थांबणार कधी ?

दुष्टचक्र थांबणार कधी ?

एकमत ऑनलाईन

देश महाशक्ती बनतो आहे, आपण विश्वगुरू बनतो आहोत, जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करते आहे वगैरे वगैरे बाबी अभिमानाने सांगताना आपल्यातील अनेक चेहरे समाधान व अत्यानंदाने अक्षरश: ओथंबलेले असतात. मात्र, याच देशाच्या समाजव्यवस्थेत आजही महिलांबाबतची जी काळी भावना आहे त्याबाबत केवळ औटघटकेची हळहळ व्यक्त होण्यापलीकडे फारसे काही होत नाही, याचा खेद वा खंत चेह-यांवर दिसत नाही. विशेष म्हणजे जसे शासनकर्ते याबाबत असंवेदनशील तसेच यंत्रणा निगरगट्ट आणि समाज औटघटकेचा आक्रोशी असे सगळे वातावरण असल्याने कितीही कडक कायदे केले, कितीही चर्चा झडल्या आणि कितीही आंदोलने झाली तरी समाजातील नराधम व पाशवी मनोवृत्तीच्या प्रवृत्तींना ना चाप बसतो ना त्यांच्यावर जरब निर्माण होते. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांचा आलेख कायम चढताच राहतो. मग याविरोधात करण्यात आलेल्या कठोरातील कठोर कायद्यांचे नेमके करायचे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. गोंदिया जिल्ह्यातील अमानुष सामूहिक बलात्कार प्रकरणात जी माहिती बाहेर येते आहे ती अक्षरश: यंत्रणेच्या मुर्दाडपणाचे व विकृत मानसिकतेचे नग्न दर्शन घडवणारीच आहे. हा सगळा प्रकार पाहता या देशात कायद्याचे राज्य शिल्लक आहे का? असाच उद्वेगजनक प्रश्न कुठल्याही संवेदनशील व्यक्तीच्या मनात निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

गोंदिया प्रकरणात अमानुषतेला बळी पडलेली पीडिता आज मृत्यूशी झुंज देते आहे व तिची ही अवस्था होण्यास पोलिसांची अक्षम्य बेफिकिरी कारणीभूत ठरल्याचे उघडकीस आले आहे. लाखनी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याने ही पीडिता आणखी दोन नराधमांच्या तावडीत सापडली आणि तिच्यावर या नराधमांनी दुस-यांदा सामूहिक बलात्कार केला. पहिल्यांदा बलात्कार झाल्यावर पीडिता मुरमाळी गावच्या महिला पोलिस पाटलाच्या मदतीने लाखनी पोलिस ठाण्यात पोहोचली होती. तिथे पोलिसांनी तिची चौकशी केली. तिची त्यावेळची स्थिती पाहता पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करायला हवे होते व तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधायला हवा होता. मात्र, पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही. तिला पोलिस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार पीडिता रात्री दहानंतर पोलिस ठाण्यातून बाहेर पडली. त्यानंतर ती धर्मा नावाच्या ढाब्यावर गेली. या ढाब्याच्या बाजूला असलेल्या पंक्चर दुरुस्ती दुकानातील अय्याज अन्सारी या कामगाराने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि अमित सारवे या मित्राला बोलावून घेतले. या दोघांनी तिला दुचाकीवर बसवून जंगलात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. दुस-या दिवशी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. लाखनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल केले असते तर ती या नराधमांच्या तावडीत सापडली नसती व तिच्यावर दुस-यांदा अमानुष बलात्कार झाला नसता. मात्र, पोलिसांना आपले कर्तव्य संवेदनशीलतेने पार पाडण्याची गरज वाटली नाही.

आता पोलिस असा दावा करतायत की, पीडिता रात्री नव्हे तर पहाटे नजर चुकवून पोलिस ठाण्यातून निघून गेली. जरी पोलिसांचा हा दावा खरा मानला तरी पीडित महिला रात्री उशिरा पोलिस ठाण्यातून बाहेर जाणे हे पोलिसांचे अपयश व कामकाजातील दिरंगाईच आहे. याचाच अर्थ लाखनी पोलिसांनी हे बलात्काराचे प्रकरण ज्या गांभीर्याने व संवेदनशीलतेने घ्यायला हवे तसे ते घेतले नाहीच! पोलिस यंत्रणेतील बेफिकिरी, मुर्दाडपणा व असंवेदनशीलतेचा हा पुरावाच नाही का? यंत्रणेत ही बेफिकिरी व असंवेदनशीलता येते ती स्त्रीला कायम दुय्यम व उपभोग्य वस्तू समजण्याच्या खोलवर रुतून बसलेल्या समाजाच्या मानसिकतेतून! याच मानसिकतेतून एकटी बाई सापडली की, संधी साधण्याची विकृती उफाळून येते व त्यातून बलात्कार होतात तसेच पीडितेवरील अत्याचाराकडे संवेदनशीलतेने बघण्यापेक्षा तिच्याकडे संशयाने बघण्याची व इतर समीकरणे जुळवण्याची व्यवस्थेची मानसिकता उफाळून येते. एखादी महिला कुठल्या भागात राहते, कुठल्या वर्गातून येते, कुठल्या जातीतून येते, ती आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सबला आहे की अबला यावरून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची किती गांभीर्याने दखल घ्यायची हे जर यंत्रणा-व्यवस्था ठरवत असेल तर या देशात सर्व नागरिकांना समान न्याय आहे, हे घोषवाक्य केवळ कागदावरच रहात नाही का? गोंदिया प्रकरणात व्यवस्थेतील हे कटू सत्यच पुन्हा एकवार बाहेर आले आहे. दहा वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतील निर्भयाला जे सोसावे लागले तेच आज गोंदिया प्रकरणातील पीडितेलाही सोसावे लागते आहे. मात्र, दिल्लीच्या निर्भयावरील अन्यायाची दखल ज्या गतीने व गांभीर्याने घेतली गेली ती गती व गांभीर्य गोंदिया प्रकरणातील पीडितेच्या नशिबी नाही. माध्यमांनाही आपले ग्राहक नसतील तर त्या भागातील लोकांच्या हालअपेष्टांची दखल घेण्यात फारसे स्वारस्य नसते, हेच वास्तव या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकवार समोर आले आहे.

हे सगळे वारंवार घडतच राहते कारण समाज म्हणून आपली असणारी मागास व बुरसटलेली मानसिकता! देशाने कितीही भौतिक प्रगती केली तरी समाजाची ही मानसिकता काही केल्या सुधारत नाही. त्यामुळे महिला अत्याचारांच्या विरोधात कितीही कठोर कायदे अस्तित्वात असले तरी त्याची जी जरब समाजातील विकृतांवर तयार व्हायला हवी ती होत नाहीच. त्यात कायद्याची प्रामाणिक व तत्पर अंमलबजावणी न होण्याचे जसे प्रमुख कारण आहे तसेच या अंमलबजावणीसाठी जागरूक राहून समाजाने यंत्रणेवर तसा दबाव निर्माण न करण्याचेही कारण आहे. शासनकर्ते व समाज जर केवळ घटना घडल्यावरच गंभीर होणार असेल आणि ते ही औटघटकेसाठी तर मग यंत्रणा सुस्तावणे अटळच! अशा सुस्त व असंवेदनशील यंत्रणेकडून मग कायद्याच्या कठोर, गतिमान व गंभीर अंमलबजावणीची अपेक्षा तरी कशी ठेवायची? बोचरे व कटू असले तरी आपल्या समाजातले हे नग्न वास्तव आहे. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कठोर कायदे होऊनही देशातील महिला अत्याचारांचे प्रमाण कमी होणे तर लांबच पण दिवसागणिक वाढतच चालले आहे. १० वर्षांपूर्वी आपल्या देशात दररोज ६८ जणींवर बलात्कार होत होते.

दशकभरात हे प्रमाण आता दिवसाला ९१ वर पोहोचले आहे. हा महिला अत्याचारांबाबतच्या समाज म्हणून आपल्या मानसिकतेचा आरसा आहे. अशा स्थितीत मग हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असा व्यथित करणारा प्रश्न निर्माण होतो. दुर्दैवाने आजच्या घडीला कुणाकडेच या प्रश्नाचे उत्तर नाही कारण हे उत्तर शोधण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत ते समाज, व्यवस्था म्हणून करायला आपण तयार नाही. घटना घडली की सगळी जबाबदारी यंत्रणेवर टाकून व तात्पुरता रोष व्यक्त करून आपण मोकळे होतो व आपल्या बिळात जातो. मग ज्या मानसिकतेने हे प्रकार घडतात ती कधी सुधारणार? कोण सुधरावणार? समाजात आपल्या आजूबाजूला वावरणा-या विकृतांची विकृती कशी दूर होणार? महिलांचा आदर, सन्मान करायला समाज कधी शिकणार? ती उपभोग्य वस्तू नाही, हे समाज म्हणून आपण कधी स्वीकारणार? स्त्रीच्या सन्मानाबद्दल समाज म्हणून आपण शतकानुशतके जी दांभिकता दाखविली आहे ती दूर करण्याचा समाज म्हणून आपण कधी गांभीर्याने प्रयत्न करणार? केवळ उदात्त परंपरांचे गोडवे गायल्याने आणि बेगडी उदात्तीकरणाने समाजाची मानसिकता व स्थिती बदलणार आहे का? या सगळ्या प्रश्नांवर समाज म्हणून प्रामाणिक आत्मपरीक्षण व चिंतनाची गरज आज आहे, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या