19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeसंपादकीयकोणाचा झेंडा घेऊ हाती..?

कोणाचा झेंडा घेऊ हाती..?

एकमत ऑनलाईन

‘मै इधर जाऊं या उधर जाऊं..’ अशी स्थिती निर्माण होते तेव्हा माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील २० जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होत आहेत. बहुतांश भागातील नियम आता शिथिल होत असले तरी काही भागातील निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत. संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करून अर्थचक्रास गती देणारे पाऊल उचलले आहे. देशात गत २४ तासांत सुमारे ८१ हजार रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा अडीच महिन्यांतील निचांक आहे. याचा अर्थ असा की देशात अधिक वेगाने लसीकरण झाले पाहिजे. दुर्दैवाने ते तसे होताना दिसत नाही.

लस पुरवठ्यासंबंधी मोठ्या केंद्रीय घोषणा झाल्या, वारेमाप आश्वासने देण्यात आली पण प्रत्यक्षात काय? सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे लसीकरण सुरू आहे. त्यातही कोवॅक्सिनचा तुटवडा. नुकतीच रशियाची स्पुतनिकही दाखल झाली आहे. परंतु अजून तिचे दर्शन नाही. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही भारतीय भावंडे असल्याचे सांगितले जाते. त्यातही दुजाभाव आहेच. कोरोनापासून संरक्षणासाठी कोविशिल्ड चांगली असल्याचे सांगितले जाते तर दुस-याच क्षणी कोवॅक्सिन भारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे डोस घेणा-यांमध्ये कोविशिल्ड घ्यावी की कोवॅक्सिन याबाबत संभ्रम! एका अहवालानुसार सीरम संस्थेने विकसित केलेली कोविशिल्ड ही लस कोवॅक्सिनहून अधिक प्रमाणात अ‍ॅन्टीबॉडीज तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर काही तज्ज्ञांनी कोवॅक्सिन अनेक व्हेरियंट्सपासून संरक्षण देते असे म्हटले आहे. बिटा आणि डेल्टा व्हेरियंटवर ही लस अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येते.

भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस बिटा आणि डेल्टा या कोरोनाच्या व्हेरियंट्सवर प्रभावी असल्याचा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे. यातील डेल्टा हा व्हेरियंट भारतातच सापडला असून बिटा हा व्हेरियंट द. आफ्रिकेत सापडला आहे. कोवॅक्सिनच्या प्रभावीपणाला ‘आयसीएमआर’ने दुजोरा दिला आहे. कोविशिल्ड ही लस ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ कंपनीने तयार केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची ही लस वापरणे अनेक युरोपीय देशांनी थांबवले असले तरी या लसीचा वापर थांबवण्याची गरज नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गुठळ्या झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. हीच लस भारतात सीरम संस्था कोविशिल्ड नावाने तयार करते. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा काही संबंध नाही. डेन्मार्कसह अनेक देशांनी रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणावरून या लसीचा वापर थांबवला होता. त्यानंतर नॉर्वे, आईसलँड, इटली, रुमानिया या युरोपियन देशांनीही या लसीचा वापर लांबणीवर टाकला. लस तयार करताना सुरक्षेची तपासणी केलेली असते व नंतरही ती प्रक्रिया सुरूच राहते.

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे ८ ते १० महिने संरक्षण मिळते असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे (एम्स)संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. लसीमुळे विषाणूपासून किती काळ संरक्षण मिळते याबाबत अनेकांना शंका होत्या पण आता त्या काही प्रमाणात दूर झाल्या आहेत. भारतात लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा लोकांच्या मनात कोवॅक्सिनबाबत शंका होती. कारण या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. परंतु पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ही लस घेतली आणि लोकांच्या मनातील शंका दूर झाली. लस घेतली तरी सामाजिक अंतर व मुखपट्टी वापराच्या नियमांमध्ये ढिलाई दाखवून चालत नाही. लसींच्या परिणामकारकतेबाबत कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसींचा विचार केला तर या दोन्ही लसींमुळे समान प्रमाणात अ‍ॅन्टीबॉडीज तयार होत असतात. त्यांची संख्याही जास्त असते. जी लस उपलब्ध असेल ती घेण्यास हरकत नाही. कारण दोन्ही सारख्याच प्रभावी आहेत. त्यांची परिणामकारकता व विषाणूपासून मिळणारे दीर्घकालीन संरक्षण सारखेच आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही दोन्ही लसींच्या संदर्भात अहवाल प्रसिद्ध होत राहतात आणि त्यामुळे लोकांच्या मनातही शंका उत्पन्न होतात.

नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार कोवॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्डमुळे जास्त अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात म्हणे. परंतु दोन्ही लसी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सक्षम आहेत असा दावाही संशोधकांनी केला आहे. दोन्ही लसींचे डोस घेतलेल्यांच्या शरीरात होणा-या बदलांचे अध्ययन केले असता, कोविशिल्डमुळे अधिक अ‍ॅन्टीबॉडीज बनत असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रामुख्याने १३ राज्यांमधील २२ शहरांत सक्रियपणे कार्य करणा-या ५१५ आरोग्य कर्मचा-यांचे तज्ज्ञांनी अध्ययन केले होते. यात ३०५ पुरुष आणि २१० महिलांचा समावेश होता. इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनात कोविशिल्डमुळे रक्तातील पेशी (ब्लड प्लेटलेटस्) काही प्रमाणात कमी होण्याचा धोका उद्भवू शकतो. हा धोका १० लाख लसींमध्ये ११ इतका असू शकतो. रक्तवाहिन्यांना हानी पोहोचल्यानंतर रक्ताची क्षती होण्यास प्रतिबंध करणा-या रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा किंवा काही प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका उद्भवू शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. अभ्यासकांची विविध मते प्रसिद्ध होत असतात. कोरोनाच्या सौम्य लक्षणांतून बरे होणा-या लोकांमध्ये या विषाणूविरोधात रोगप्रतिकारक क्षमता प्रदीर्घकाळ टिकून राहते असे एक मत पुढे आले आहे.

कोरोनामुक्त झाल्याच्या काही महिन्यांनंतर देखील लोकांमध्ये रोगप्रतिकारक पेशी कायम असतात. या पेशी कोरोनाविरोधात लढण्याचे काम करत असतात. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचा धोका कमी होतो. आता आणखी एका प्रयोगामुळे दोन भिन्न लसींचा परिणाम सकारात्मक आला आहे. लसींचे ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ समीकरण प्रभावी ठरले आहे. लसींचा पुरवठा नसणे आणि उपलब्ध लसींच्या परिणामकारकतेमुळे ब-याच देशांना ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’चा गंभीरपणे विचार करावा लागला आहे. भारतासारख्या देशामध्ये लसीचा डोस वेळेवर न मिळाल्यामुळे लोकांना दुस-या डोससाठी बराच काळ थांबावे लागत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेमुळे आणि या विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे धोकाही वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या मनाची चलबिचल होणे साहजिक आहे. त्यातूनच त्याला प्रश्न पडतो… कोणाचा झेंडा घेऊ हाती..?

जंगली बाजरी ‘पान कणीस’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या