31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home संपादकीय बथ्थड व्यवस्थेची कातडी थरथरेल?

बथ्थड व्यवस्थेची कातडी थरथरेल?

एकमत ऑनलाईन

भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेने डोळे उघडून जग कसे असते, हे ही अद्याप पाहू न शकलेल्या, ज्या मातेने आपल्याला जन्माला घातले त्या मातेची कूसही मातृसुखाच्या स्पर्शाने उजवू न शकलेल्या दहा निष्पाप बालकांना बथ्थड व गेंड्याची कातडी पांघरुण कार्यरत असलेल्या व्यवस्थेचे बळी ठरावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत त्यामुळे ज्या मातांनी आपल्या पोटचा गोळा गमावला त्यांच्या सांत्वनासाठी गेल्यावर या मातांच्या आभाळभर दु:खाच्या व जन्मभराच्या वेदनांच्या आर्त टाहोंनी त्यांना नि:शब्द केले. या मातांसमोर ते केवळ हात जोडून उभे राहिले तर पंतप्रधान मोदींनी या घटनेवर शोक व्यक्त करताना ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे, या शब्दांत दु:ख व्यक्त केले. हे साहजिकच! मुख्यमंत्री, पंतप्रधानच काय पण संवेदना असणारा कुठलाही ‘माणूस’ या घटनेने व्यथित होणार, नि:शब्दच होणार कारण घडलेला प्रकार हा महाभयंकरच आहे.

मूल जन्माला आल्यावर त्याची प्रकृती नाजूक आहे म्हणून त्याला वाचविण्यासाठी मातेने काळजावर दगड ठेवत ते ज्या यंत्रणेच्या हाती विश्वासाने सोपविले त्या यंत्रणेचा बथ्थडपणाच काळ ठरून या निष्पापांचा बळी घेत असेल तर याला काय संबोधावे? शासकीय यंत्रणेच्या लेखी भलेही त्याला अपघात असे संबोधले जात असेल पण ज्यांनी आपल्या पोटचा निष्पाप गोळा गमावला त्यांच्या लेखी हा यंत्रणेने त्यांचा केलेला हा क्रूर विश्वासघात आहे व त्यांच्या निष्पाप लेकरांची केलेली क्रूर हत्याच आहे! त्यांचे दु:ख ना सांत्वनाने मिटणारे आहे, ना काही लाखांच्या नुकसानभरपाईच्या आकड्याने भरून निघणारे आहे, ना चौकशीच्या ‘फार्स’मधून दोघा-चौघांवर होणा-या लुटूपुटूच्या कारवाईने मिटणारे आहे. क्षणिक हळहळ व्यक्त करून काही तासांतच जीवनाच्या रहाटगाड्यात रममाण होणा-या जनजीवनासाठी या बाबी चर्चेच्या विषय ठरू शकतात पण ज्यांच्या वाट्याला हे दु:ख प्रत्यक्षात आले आहे ते त्यांना त्यांच्या आयुष्यभरासाठी पुरून उरणारे आहे.

विश्वासघाताची ही सल मनात दाबून व हृदयाला झालेल्या भळभळत्या जखमेसहच त्यांना उर्वरित आयुष्य कंठावे व सोसावे लागणार आहे. त्यांच्या या वेदनांवर ख-या अर्थाने फुंकर घालायची तर गेंड्याची कातडी पांघरुण कार्यरत असणा-या यंत्रणेची कातडी बुडापासून थरथरावी लागेल, संवेदनशील व्हावी लागेल. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ टाईप चौकशा, लुटूपुटूच्या कारवाया व पुन्हा झोपेचे सोंग घालवण्यासाठी अशा नव्या घटनेची प्रतीक्षा यातून बथ्थड यंत्रणेची कातडी थरथरणार का? या यंत्रणेत संवेदनशीलता येणार का? यंत्रणेत सेवाभाव जागृत होऊन त्याला माणुसकीचा गहिवर फुटणार का? हे खरे प्रश्न! देशाचा स्वातंत्र्यानंतरचा झालेला प्रवास, त्यात यंत्रणेच्या निष्ठूरतेचे आलेले अगणित अनुभव, प्रत्येक घटनेनंतर गदारोळ थंड करण्यासाठी झालेल्या चौकशा व दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या, अजिबात गय करणार नसल्याच्या घोषणा, अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये यासाठी पूर्ण दक्षता घेण्याची दिली जाणारी आश्वासने आणि त्याच्या जोडीला एकमेकांवर सुरू होणारे राजकीय चिखलफेकीचे सत्र या सगळ्यांचा इतिहास तपासला तर वरील प्रश्नांचे उत्तर मिळते.

देशातील सर्वसामान्य व गरीब जनतेने या उत्तराचा पदोपदी अनुभव घेतला आहे आणि ‘आपलं नशीब’म्हणत स्वत:च्या परिस्थितीला बोल लावत स्वत:चेच सांत्वन करून घेतले आहे! त्यामुळेच भंडारा घटनेनंतर आज शोककल्लोळ सुरू असताना भविष्यात त्यातून वेगळे काय घडणार आहे? यंत्रणेची गेंड्याची कातडी बुडापासून थरथरेल यासाठी काय केले जाणार आहे? शोक व सांत्वनाच्या भावना व्यक्त होणे साहजिकच पण ज्या बथ्थड व्यवस्थेमुळे समाजावर वारंवार असा शोक व्यक्त करण्याची वेळ येते ती बथ्थड व्यवस्था मुळातून सुधरवण्यासाठी व ती संवेदनशील बनविण्यासाठीची इच्छाशक्ती कोण दाखविणार आहे? त्यासाठी समाज म्हणून आपण सर्वसामान्य एकत्रित रेटा कधी निर्माण करणार आहोत? हे खरे प्रश्न आहेत आणि त्यावरच ख-या अर्थाने चिंतनाची व चर्चेची गरज आहे.

माघार रजनींची, उत्सुकता कमलची

महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणारा, तशा वल्गना करणारा आपला देश स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटून गेल्यावरही देशातील जनतेला सुरक्षित आरोग्य देण्यासाठी किती परिणामकारक व सुसज्ज सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करू शकला याचा थेट पुरावाच कोरोना संकटाने देशाला दिला व देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली. त्यातून काहीएक बोध राज्यकर्त्यांनी व यंत्रणेने घेतला असता तर भंडा-याची घटना घडलीच नसती. अर्थात बोध घेण्याची ही काही ७० वर्षांतील पहिलीच वा अपवादात्मक घटना आहे, असे नाहीच! दर चार-सहा महिन्याला घडणा-या अशा घटना आपल्याला, यंत्रणेला व ही यंत्रणा हाताळण्याचे अधिकार असणा-या राज्यकर्त्यांना तशी संधी मिळवून देतातच. याआधीची ताजी संधी म्हणजे गोरखपूरमध्ये प्राणवायूअभावी गुदमरून व तडफडून मरण पावलेले शंभर कोवळे व निष्पाप जीव! आपली यंत्रणा व व्यवस्था कशी गुदमरून, तडफडून प्राण सोडते आहे याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे ही घटना.

ती घडल्यावर वर उल्लेखिल्याप्रमाणे सर्व सोपस्कार पार पडलेच होते. चौकशी, ऑडिट रिपोर्ट, ग्राऊंड रिपोर्ट, सुधारणांचे आराखडे, दक्षता उपाय सुचविणा-या तज्ज्ञांच्या समितीचे अहवाल, दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन वगैरे वगैरे! या सगळ्याचे पुढे काय झाले? व्यवस्थेत किती आमूलाग्र बदल झाला? ती कशी सुसज्ज व दक्ष बनली? व्यवस्थेत किती प्रचंड संवेदनशीलता आली? आपल्या राज्यकर्र्त्यांनी किती गांभीर्याने व दक्षतेने त्यासाठी कठोर प्रयत्न केले? घटनेसाठी सरकारला धारेवर धरणा-या विरोधी पक्षांनी व्यवस्थाबदलासाठी किती सातत्यपूर्ण पाठपुरावा करून तीव्र रेटा उभा केला? किती कडवा संघर्ष केला? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे १०० बळी घेतल्यानंतर यंत्रणा व व्यवस्थेची गेंड्याची कातडी कितपत शहारली? या सगळ्या प्रश्नांचे मिळालेले थेट उत्तर म्हणजे भंडा-यातील घटना व त्यात दहा निष्पापांना जग बघण्याआधीच गमवावे लागलेले जीव! आता या घटनेनंतरही सगळ्या ठरलेल्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती सुरू झालेलीच आहे किंबहुना ती होणे अटळच! मात्र, त्यातून वेगळे काय निष्पन्न होणार? हाच खरा प्रश्न!

सरकारला या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करायचे तर व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची कठोर इच्छाशक्ती दाखवून हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार दाखवावा लागेल! देशातील सर्वांत प्रगत व चांगली आरोग्य व्यवस्था असल्याचा दावा करणा-या महाराष्ट्रात ही घटना घडली आहे व प्राथमिक तपासणीतूनच या दाव्याची लक्तरेही बाहेर येत आहेत. ती पुरती वेशीवर टांगली जाऊ द्यायची नसतील तर महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा, राज्याचा अभिमान असल्याचा दावा करणा-या प्रत्येकाने घटनेतून बोध घेत बथ्थड व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेचा कठोर निर्धार करून सर्व शक्तीनिशी, पूर्ण गांभीर्याने व तीव्र इच्छाशक्तीने कामाला लागायला हवे. अर्थातच त्याचे नेतृत्व सरकारला व सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना करावेच लागेल पण त्यांना या कामी सर्वतोपरी, प्रामाणिकपणे व राजकारणविरहित सहकार्य करण्याची, साथ देण्याची विरोधी पक्षाचीही तेवढीच जबाबदारी आहे तरच आज व्यक्त होत असलेला शोक व आक्रोशाला खरा अर्थ प्राप्त होईल आणि व्यवस्थेची कातडी थरथरेल, संवेदनशील होईल! हीच या निष्पाप बालकांना खरी श्रध्दांजली आहे, हे मात्र निश्चित !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या