19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeसंपादकीय...लाभला निवांत संग!

…लाभला निवांत संग!

एकमत ऑनलाईन

‘मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात, लाभला निवांत संग’ हे गीत ब-याच जणांच्या ओठी असेल. प्रेयसीची प्रियकराच्या सहवासाची अगतिकता त्यातून स्पष्ट होते. रोमान्सच्या (प्रियाराधन) दुनियेतील ही अगतिकता, ओढ राजकारणातही दिसू शकते मात्र त्याचे संदर्भ वेगवेगळे असू शकतात, असतात. वासुगिरीचा छंद असलेल्या पत्रकार जमातीला त्याचे वेगवेगळे वास येतात. आपल्या सोयीनुसार ते त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात. अर्थात तेच त्यांचे काम आहे. नाही तरी एखाद्या घटनेचा जो तो आपापल्या परीने अर्थ लावत असतो. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अन् चर्चेचे गु-हाळ सुरू झाले. तुम्ही मोदींची भेट कशी काय घेतली? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी आणि पंतप्रधान मोदी राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचे नाते तुटलेले नाही. त्यामुळे मी मोदींची वैयक्तिक भेट घेतली असेल तर त्यात गैर काय? उद्धव ठाकरे यांचा सवाल बिनतोडच होता.

काही नाती अशी असतात की त्यावर कितीही घाव घातले तरी ती तुटता तुटत नाहीत. नाती तुटत नाहीत, नाळ सुटता सुटत नाही. म्हणूनच जीवनाला काही तरी अर्थ असतो किंवा यालाच जीवन ऐसे नाव! सुमारे दीड तासाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोघांमध्येच एकांतात चर्चा झाली म्हणे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या म्हणे. अर्थात भुवया या उंचावण्यासाठीच असतात. त्यातून विविध भावार्थ व्यक्त होत असतात. एकेका दृष्टिक्षेपासह भुवयांचे आकार बदलत असतात. नुकतेच नव्हे अनेकवेळा उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितले आहे की, राजकारणात कोणीही एकमेकांचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. अजितदादा हे रोखठोक बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. जे पोटात तेच ओठात! उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, यापुढेही मी मोदींना भेटू शकतो… मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. येथे उद्धवजींना एका गोष्टीचा विसर पडला… स्वत: मोदीच नवाज मियाँना भेटावयास गेले होते! अर्थात यात मोदींचाही दोष नव्हता कारण त्यांचे विमानच पाकिस्तानच्या दिशेने गेले होते.

हवा का झोंका आया और हवाई जहाज पाकिस्तान की ओर चला गया…! लोकांना काय… लोक काहीही बोलतात. काही दिवसांपूर्वीच राजकारणातले भीष्म पितामह शरद पवार यांची ‘मी पुन्हा येईन’फेम देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या पोटात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता… पोटात खड्डा पडला होता असं म्हणणं बरोबर दिसणार नाही ना! काही जण (वात्रट मंडळी) देवेंद्रजींचा उल्लेख ‘टरबूज’ असा करतात. परंतु हेच टरबूज उन्हाळ्यात किती थंडावा देते त्याचे काहीच नाही का? टरबुजाचा लाल लाल गर आनंदाने खायचा आणि नंतर त्याला हिणवायचे हे बरोबर नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधानांशी संवाद सुरू केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. संवादाचा नेहमीच फायदा होतो पण राज्य सरकारकडून कृतीची अपेक्षा असलेल्या विषयांपेक्षा केंद्राशी निगडीत विषयांवर पाठपुरावा केला तर ते संयुक्तिक होईल असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची वैयक्तिक भेट होणे हा शिरस्ताच आहे. त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असे देवेंद्र म्हणाले.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा केली. काही प्रशासकीय, काही वैधानिक, काही राजकीय विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी हे कोणाचे ऐकून घेत नाहीत, राज्य सरकारांना व त्यांच्या प्रमुखांना फारशी किंमत देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनाही मूकदर्शक बनवून बसवून ठेवतात असे आरोप नेहमीच केले जातात. परंतु या निमित्ताने मोदींमध्ये बदल घडतो आहे असे दिसते. हा बदल आभासी आहे काय याचे उत्तर काळच देईल. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना किंमत देत नाहीत असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. लसीकरणाच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रावर कोरडे ओढले होते. कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांचे बळी गेल्याबद्दलही न्यायालयाने केंद्राला झापले होते. त्यामुळे मोदींच्या मानसिकतेत बदल झाला असावा. सध्यातरी पंतप्रधान देशाचे पालक या नात्याने अडचणी घेऊन येणा-या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यांना भेडसावणा-या प्रश्नांविषयी केंद्र सरकार संवेदनशील आहे, विरोधी पक्षाचे सरकार असले तरी मदत करण्याची आपली भूमिका आहे असा संदेश मोदींनी दिला आहे असे म्हणता येईल. कदाचित आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचाही प्रयत्न असावा. काही का होईना बदल घडतो आहे हे महत्त्वाचे. डोळ्यांतील अश्रू नक्राश्रू नसावेत म्हणजे झाले! मराठा आरक्षणासह राज्याचे केंद्र सरकारशी निगडित विविध प्रलंबित विषयांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व विषय पूर्णपणे समजून घेतले असून त्यात त्यांनी लक्ष घालून पुढचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची एकांतात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दरम्यानच्या काळात अजित पवार व अशोक चव्हाण पंतप्रधान निवासातील मोर पाहण्यात गुंग होते म्हणे. मोराचा नयनरम्य पिसारा पाहण्यात आणि केकारव ऐकण्यात वेगळीच मजा असते. तुमच्या अस्तित्वाची जाणीव न झाल्यास मोर आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून अर्धा-अर्धा तास नाचत असतो… जंगल में मोर नाचा किसने देखा…!

कुष्णूर जुगार अडडा प्रकरण : ठाणे प्रमुख अडचणीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या