24 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home संपादकीय ...जखमा उरातल्या !

…जखमा उरातल्या !

एकमत ऑनलाईन

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत. त्या रात्रीचा थरार अजूनही कायम आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हँडग्रेनेडस्सह बेछूट गोळीबार केला होता. दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, लिओपोल्ड कॅफे, ताजमहल पॅलेस, ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेल येथे हल्ला करत निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. यात १६० हून अधिक लोक मारले गेले तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानमधील कराची येथून १० दहशतवादी बोटीने मुंबईत दाखल झाले. या बोटीवर चार भारतीयही होते. बोट किना-यावर लागताच त्या चौघांना ठार करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास हे दहशतवादी कुलाब्याजवळील मासे बाजारात उतरले. त्यानंतर चार गटांत विभागणी करत दहशतवाद्यांनी ठरलेली ठिकाणे गाठली. तीन दिवस दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. अखेर २९ नोव्हेंबरच्या सकाळी ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

अजमल कसाबला मात्र जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. दहशतवाद्यांशी लढा देताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, एसीपी अशोक कामटे यांना वीरमरण आले. हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले मात्र यावेळी झालेल्या गोळीबारात तुकाराम ओंबाळे शहीद झाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ला थांबवण्यासाठी पोलिस अधिकारी राकेश मारिया यांनी पोलिस कंट्रोल रूम सांभाळली होती. कंट्रोल रूममध्ये बसून मारिया हे दहशतवादी कोठे लपले आहेत आणि कुठून गोळीबार करत आहेत याची माहिती देत होते. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी एनएसजीचे कमांडोही झुंजत होेते. दहशतवाद्यांचा गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यात कमांडो गजेंद्रसिंह बिष्ट आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आले. २६ नोव्हेंबर २००८ हा काळा दिवस म्हणून मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जणांचा मृत्यू तर ८०० हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जाते. दहशतवाद्यांना रोखण्यात मुंबई पोलिसांचेही मोठे योगदान आहे. अजमल कसाबला जिवंत पकडणा-या पोलिस कर्मचा-यांच्या पथकाला बढती देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

१४ पोलिसांच्या या पथकाने कमालीचे शौर्य दाखवले होते. पथकातील तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगजाहीर आहे. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि त्या दहशतवादापासून जगाला असलेल्या धोक्याचा केंद्रबिंदू कोठे आहे यासंबंधात भारताने सातत्याने जागतिक स्तरावर ठामपणे मुद्दे मांडले आहेत; परंतु जागतिक स्तरावर त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. एखाद्या राष्ट्राला या दहशतवादाची झळ बसली की तेवढ्यापुरती उपाययोजना केली जाते. परंतु दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. भारत मात्र सातत्याने जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्धचा मुद्दा मांडत राहिला आहे. नुकतेच न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जैस्वाल यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे सहकार्य आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्याला जबाबदार असणा-यांना शिक्षा होणे जगासाठी, जागतिक समुदायासाठी व न्यायासाठी महत्त्वाचे आहे. या भीषण हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी जे आवश्यक आहे ते पाकिस्तानने करावे असे जैस्वाल म्हणाले.

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला हिमालयातील हरकीदून पर्वत

या उलट पाकने जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याच्यासह इतर आरोपींच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचेच काम केले आहे. भारताला हवा असलेला हाफीज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांच्यावर कारवाई करण्यात पाकने वारंवार टाळाटाळच केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या १९ सदस्यांचा सहभाग होता. त्यांचा ‘मोस्ट वाँटेड टेररिस्ट’ यादीत समावेश आहे. परंतु एक तप उलटून गेले तरी त्यांना पकडण्यासाठी तसेच खटला सुरू करण्यासाठी कसलीही हालचाल केलेली नाही. या ‘मोस्ट वाँटेड’पैकी काही जण पाकमध्ये लपले असून काहीजण देशाबाहेर पळून गेले आहेत असे मानले जाते. हे दहशतवादी एक तर हल्लेखोरांनी वापरलेल्या बोटींवरील नाविक होते किंवा २६/११च्या हल्ल्याचे वित्तपुरवठादार होते. संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. पण पाकचे संयुक्त राष्ट्रातील दूत मुनीर अक्रम यांनी भारतच पाकिस्तानात दहशतवाद पसरवीत असल्याचा आरोप केला.

अर्थात जगभरातील कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. कारण पाकमधील अ‍ॅबोटाबाद येथे २००१ मध्ये अल कायदाचा प्रमुख लादेन मारला गेला होता हे जगजाहीर आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्यात पाकिस्तान आघाडीवर आहे हे सा-या जगाला माहीत आहे. नुकतेच जम्मूतील नग्रोटा येथे पाकने हल्ल्याचा केलेला कट भारताच्या सुरक्षा दलाने १९ नोव्हेंबरला हाणून पाडला. हे दहशतवादी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. भारताने दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या एकजुटीची निकड व्यक्त केली असून मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांना कडक शासन करण्याची पाककडे मागणी केली आहे. अमेरिका व इस्रायलने दहशतवादविरोधात भारताला पाठिंबा दिला आहे. इस्रायलमध्येही राजधानी जेरूसलेम येथे २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पाक पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करत हल्ल्यातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दहशतवादाला खतपाणी घालणा-या आणि इतर मदत पुरवणा-या देशाचा कडाडून विरोध झाला पाहिजे ही इस्रायलची मागणी रास्तच आहे. दहशतवादाचा राक्षस वाढवणा-या देशांवर आर्थिक व धोरणात्मकरीत्या बहिष्कार टाकण्यासाठी सर्व शांतता समर्थक देशांनी एकत्र आले पाहिजे.

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

भारतासारख्या शांततावादी देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास इस्रायल उत्सुक आहे ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हटली पाहिजे. इंग्लंडमध्येही अलीकडे दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्याला चाप लावण्यासाठी तेथे दहशतवादविरोधी संचलन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला ब्रिटिश सरकारने ८० कोटी पौंड (सुमारे ७८ अब्ज रुपये) एवढा निधी देऊ केला आहे. ब्रिटन पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा देशाला अभेद्य असे सुरक्षाकवच देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी दहशतवादविरोधी संचलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व यंत्रणा संयुक्तरीत्या दहशतवादाचा बीमोड करणार आहेत. दहशतवादाचा यशस्वीपणे सामना करावयाचा असेल तर अन्य इतर देशांनीसुद्धा ब्रिटनच्या सरकारचे अनुकरण केले पाहिजे. एखाद्या हल्ल्यानंतर खडबडून जागे होण्यापेक्षा संभाव्य हल्ला गृहित धरून त्या-त्या देशांनी आपली संरक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे. दहशतवादी हल्ल्याच्या जखमा विसरणे अशक्य आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलेली भावना योग्यच आहे. २६/११च्या निमित्ताने ‘उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या…!’

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या