मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या अध्यक्षपद व सभापतीपदाच्या निवडणुका २० मार्चपूर्वी होणार आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबतचे आदेश जारी केल्याने आता राजकीय घडामोडींना व राजकीय समीकरणाच्या मांडणीला वेग येणार आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा-या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होऊन ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाले आहेत. परंतु जिल्हा परिषद अध्यक्षांची, तसेच पंचायत समित्यांच्या सभापती पदांची निवडणुक कधी होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर ग्रामविकास विभागाने गुरुवारी याबाबतचे आदेश जारी करून २० मार्चपूर्वी पहिली बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम मधील कलम ११(१) व ५९(१) नुसार निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो.
समीकरणाची जुळवाजुळव सुरू
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी या १२ जिल्ह्यापरिषदांची निवडणूक झाली आहे. यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सत्तेसाठी वेगवेगळी समीकरणं तयार झाली आहेत. सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे कुठे कोणाचे समीकरण जुळणार व कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

