पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १० ऑक्टोबरला अधिसूचना काढली जाणार आहे, तर दुस-या टप्प्यासाठी १३ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार आहे.
दोन टप्पे कोणते?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुस-या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.
असा आहे कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख : पहिल्या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबर, दुस-या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर.
– अर्ज पडताळणीची तारीख : पहिल्या टप्प्यासाठी १८ ऑक्टोबर, दुस-या टप्प्यासाठी २१ ऑक्टोबर.
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : पहिल्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर, दुस-या टप्प्यासाठी २३ ऑक्टोबर.
– मतदानाची तारीख : पहिला टप्पा ६ नोव्हेंबर, दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर.
– मतमोजणी : १४ नोव्हेंबर.
जम्मू-काश्मीरसह ७ राज्यांत पोटनिवडणुका
७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत आणि निकाल १४ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीसोबत जाहीर केले जातील. ज्या जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत त्यात राजस्थानमधील अंता, जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा, पंजाबमधील तरणतारन, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील जुबली हिल्स, मिझोराममधील दंपा आणि ओडिशातील नुआपाडा यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या भागात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

