16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील २४ नगर परिषदांच्या निवडणुका ऐनवेळी लांबणीवर

राज्यातील २४ नगर परिषदांच्या निवडणुका ऐनवेळी लांबणीवर

निवडणूक आयोग नापास, राज्यात तीव्र संताप, विरोधक आक्रमक २५१ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी आज मतदान, राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २५१ नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) मतदान होत असून, निमशहरी भागात कोण बाजी मारणार याचा फैसला बुधवारी होणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्यासह युतीच्या नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे या तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच विरोधकांनीही अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणासाठी २४ ठिकाणची निवडणूक पुढे ढकलली. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेत आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. २ डिसेंबरला सर्वत्र मतदान होणार होते.अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत अपिलांवर निर्णय न झाल्याने २४ नगरपरिषदा व नगरपंचायतीची तसेच १५४ सदस्यपदाची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली तर ३ नगर परिषदा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उद्या २५१ नगरपालिका व नगरपंचायतीची निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील तिन्ही घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष बहुतांश ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस वगळता शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी या निवडणुका स्थानिक नेत्यांवर सोडल्या आहेत. महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी या निवडणुकीत बरीच ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही प्रचारासाठी राज्यभर फिरले. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत तर सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत जोरदार संघर्ष झाला. आता निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाची ताकद दिसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आता २४ नगरपालिकांमध्ये
निवडणूक २० डिसेंबरला !
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांचा जेथे २३ नोव्हेंबरपूर्वी निकाल दिला गेला नाही, अशा २४ नगरपरिषदा व नगरपंचायतीची, तसेच विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली. यामध्ये मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील १७ पालिकांच्या कार्यक्षेत्रातील ३८ प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली. या ठिकाणच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार स्थगित करण्यात आलेल्या नगर परिषदा आणि नगरसेवक पदासाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

आता उमेदवारी अर्ज
माघारीपासून प्रक्रिया
आता नव्याने उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीत. अर्ज माघारीपासून प्रक्रिया होईल. १० डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. तर २० रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. याचाच अर्थ ३ डिसेंबरच्या निवडणूक निकालाच्या आधारावर पुन्हा सत्ताधा-यांकडून दबावाचे राजकारण केले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या २४ नगरपालिकांची
२० डिसेंबरला निवडणूक
ठाणे : अंबरनाथ, अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी व नेवासा, पुणे : बारामती व फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूर : अनगर व मंगळवेढा, सातारा : महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री, नांदेड : मुखेड व धर्माबाद, लातूर : निलंगा व रेणापूर, हिंगोली : वसमत, अमरावती : अनंजनगाव सूर्जी, अकोला : बाळापूर, यवतमाळ : यवतमाळ, वाशिम : वाशिम, बुलडाणा : देऊळगाव राजा, वर्धा : देवळी, चंद्रपूर : घुग्घूस.

नगराध्यक्षपद
निवडणूक
घोषणा : २८८
बिनविरोध : ३
स्थगित : २४
आज मतदान – २५१

तब्बल ७३१ जागांवरील
निवडणूक पुढे ढकलली
(विभागनिहाय आकडेवारी)
अमरावती विभाग : १८७
छ.संभाजीनगर : १४४
पुणे : १४३
नाशिक : १२०
कोकण : ६९
नागपूर : ६८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR