Homeराष्ट्रीयदेशात डेटा केंद्रांची विजेची मागणी ८००% वाढणार

देशात डेटा केंद्रांची विजेची मागणी ८००% वाढणार

अत्याधुनिकता... एआय-डिजिटल सेवांच्या वापरात मोठी वाढ २०३१-३२ पर्यंत १३.५६ गिगावॉटची गरज असेल

नवी दिल्ली : देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. २०३१-३२ पर्यंत डेटा सेंटर्सकडून विजेची मागणी १३.५६ गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते. सध्या देशात डेटा सेंटरची क्षमता वेगाने वाढत आहे. ही २०२० मध्ये ३७५ मेगावॉट होती, जी २०२५ पर्यंत वाढून सुमारे १,५०० मेगावॉट झाली आहे. पुढील सुमारे ७ वर्षांत विजेची मागणी ८००% वाढण्याचा अंदाज आहे.

सरकारनुसार, अक विकासाला चालना देण्यासाठी १४ सेवा प्रदाते आणि डेटा सेंटर्सद्वारे ३८,२३१ जीपीयू उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि शिक्षण संस्थांना सरासरी ६५ रुपये प्रति तास सवलतीच्या दराने दिले जात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, देशातील प्रमुख डेटा सेंटर्स मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, नोएडा आणि जामनगर येथे आहेत. भारतात एआय अ‍ॅप डाउनलोड्स वेगाने वाढले आहेत आणि २०२५ मध्ये भारतीयांनी सुमारे ०.६ अब्ज (६० कोटी) एआय अ‍ॅप्स डाउनलोड केले. लोक एआयचा वापर अभ्यास, प्रश्नांची उत्तरे, भाषांतर, कामाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि कंटेंट तयार करण्यासाठी करत आहेत.

६५% भारतीयांनी एआयचा वापर केला
भारतात एआयचा वापर खूप वेगाने वाढत आहे. मायक्रोसॉफ्टच्या २०२४-२५ च्या अहवालानुसार, सुमारे ६५% भारतीय लोकांनी कमीतकमी एकदा जनरेटिव्ह एआय(जसे की चॅटबॉट किंवा एआय अ‍ॅप) वापरले आहे. देशाची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे. यापैकी सुमारे ६५% म्हणजे जवळपास ९०-९५ कोटी लोकांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अक टूलचा वापर केला आहे.

इंडिया एआय मिशन
देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ‘इंडिया एआय मिशन’ सुरू केले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार देशात एआय कंपन्या आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करत आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या या मिशनसाठी १० वर्षांत ९०,३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. १५,६३४ ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या मदतीने देशात हाय-एंड कॉम्प्युटिंग सुविधा विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे.

जगात भारताला तिसरे स्थान
स्टॅनफोर्डच्या जागतिक स्पर्धेत भारत आता अमेरिका व चीननंतर तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे. २०२४ मध्ये भारताचा स्कोअर २९.५५ होता, तर अमेरिका ३८.६५ स्कोअरसह पहिल्या, तर चीन दुस-या क्रमांकावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR