मुंबई : ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून बॉम्ब शोधण्याचे काम सुरू आहे. अज्ञात मेलद्वारे प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली.
त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून आयुक्त, डीएसपी, एसपी घटनास्थळी आले आहेत. बॉम्बशोधक पथक प्रार्थनास्थळात गेले असून बॉम्बचा शोध घेतला जात आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक दिवसापूर्वी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली होती. शिवाय दूतावासाबाहेर एक पत्र सापडले होते, त्यात धमकी देण्यात आली होती. तसेच आरबीआयच्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याचा ईमेल देखील आरबीआयला मिळाला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.