तेहरान : अमेरिका-इराणमधील युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार की युद्ध संपणार? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. कारण अमेरिका-इराणमधील युद्ध संपवण्याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता करारासाठी हालचाली सुरू आहेत. पण दुस-या फेरीत देखील युद्धाबाबत ठोस तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे. यातच अमेरिकेने काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी सुरू केलेली आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणा-या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.
अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करत इराणला इशारा देत असल्याने हे युद्ध पुन्हा भडकणार का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणने हा प्रस्ताव दिला असून तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध पूर्णपणे संपवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सांगितली जात आहे.
नव्या प्रस्तावात काय?
इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याचे वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. इराणने अमेरिकेकडे अशी मागणी केली की ‘लेबनॉनसह सर्व युद्ध थांबवावे, नौदल नाकेबंदी हटवावी, संपूर्ण सैन्य मागे घ्यावे, इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत, इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशा विविध १४ अटी इराणने अमेरिकेला दिलेल्या प्रस्तावात ठेवल्या आहेत.
















