मुंबई : बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्टच्या रात्री लखनौमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्येचा सामना करत होते. रिपोर्टस्नुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होत. त्यानंतर ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मूळ गावी लखनौला गेले होते.
मिथिलेश चतुर्वेदी यांच्यासोबत ‘क्रेझी ४’ आणि ‘कोई मिल गया’ या सिनेमात काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी सांगितले की, मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे ते तब्येतीत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी लखनौला गेले होते. ३ ऑगस्टच्या रात्री त्यांचे निधन झाले.
‘भाई भाई’ चित्रपटातून केले पदार्पण
मिथिलेश चतुर्वेदी यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटामधून पदार्पण केले. त्यानंतर सत्या, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, बंटी और बबली, रेडी, गदर : एक प्रेम कथा, कोई मिल गया आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.