मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या किलर लूक आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. कॅमे-यात स्टायलिश दिसण्यासोबतच ती सामाजिक कार्याशीही जोडलेली आहे. विशेषत: महिलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी ती नेहमीच काही ना काही युक्त्या अवलंबत असते. इतकेच नाही तर तिच्या वर्कफ्रंटमध्येही ती स्त्रीकेंद्रित चित्रपटांकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करते. लवकरच ती अशाच एका हॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करणार आहे.
नुकतेच जॅकलिन फर्नांडिसने तिच्या पुढील हॉलिवूड चित्रपट ‘टेल इट लाईक अ वुमन’चे पहिले पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये मार्गेरिटा बाय, इव्हा लॉन्गोरिया, कारा डेलेव्हिंग्ने, अॅनी वातानाबे, जेनिफर हडसन आणि मार्सिया गे हार्डन यांचे फोटो देखील आहेत. हे शेअर करत जॅकलिनने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. हा एक अँथॉलॉजी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन जगातील विविध भागांतील ८ महिला चित्रपट निर्मात्यांनी केले आहे.
जॅकलीनच्या पोस्टनुसार, ती ज्या चित्रपटात काम करत आहे त्या चित्रपटाचे नाव ‘शेअरिंग अ राईड’ आहे, ज्याचे दिग्दर्शन लीना यादव यांनी केले आहे. यात ट्रान्सजेंडर मॉडेल अंजली लामा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टेल इट लाईक अ वुमन’चे शूटिंग इटली, भारत आणि अमेरिकेत झाले आहे.
जॅकलिनने २०१५ मध्ये आलेल्या ‘डेफिनिशन ऑफ फिअर’ या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. त्यानुसार जॅकलिनच्या खात्यात एक ऑफ हॉलिवूड चित्रपट जमा झाला. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.