मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे हे त्यांच्या फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे साहित्यातील खरा नायक आता चित्रपटातही नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे साहित्य संवर्धनाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, बालाघाट मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनासह देशात विविध प्रकारची १५६ साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत.
प्रिये, प्रेम, शेतक-यांच्या आत्महत्या की हत्या, धर्माची दारू अन् जातीची नशा, कथा पोपटरावांची, बालाघाटाचा सिंह, मराठी भाषेचा सम्रग इतिहास यासह एकूण १० ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे, युगंधर प्रकाशन संस्थेच्या वतीने त्यांनी आजवर १४७ पुस्तके प्रकाशित केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले आदी विषयांवर हजारो व्याख्याने दिली आहेत.
यासोबतच रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या, ऐतवी आदी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक व संगीतकार म्हणूनही कार्य केले. द शिवाजी मॅनेजमेंन्ट गुरू या नाटकासह प्रेम, तुझ्याविन या अल्बमचे गीत लेखन करून ते संगीतबध्द केले आहे. लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, निर्मिता असलेले शरद गोरे आता फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत, तुफान विनोदी असलेल्या या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखेबद्दल रसिकांना कमालीची उत्सुकता आहे.
सुप्रसिद्ध मॉडेल मिसेस एशिया पॅसिपिक व मिसेस इंडिया विजेती डॉ रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर झारखंड) या मराठी चित्रपटाव्दारे रूपेरी पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत आहे. डॉ. रम्यता या नागपूरच्या कन्या असून त्या मिसेस झारखंड, मिसेस इस्ट इंडिया, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिपिक विजेत्या आहेत. या निमित्ताने शरद गोरे व डॉ. रम्यता प्रफुल्ल नवीन जोडी मराठी चित्रपट सृष्टीस मिळाली आहे.
गीतलेखन शरद गोरे व दीपक गायकवाड यांनी केले आहे तर संगीत शरद गोरे यांनी दिले आहे व स्वरसाज कुणाल गांजावाला, कविता राम, राजेश्वरी पवार यांनी चढिवला आहे. प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला, रमाकांत सुतार, प्रकाश धिंडले, सुनील साबळे, अमोल कुंभार, कृष्णा खबाले आदी कलाकार या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करीत आहेत. रवींद्र लोकरे हे छायाकंन केले आहे, श्रध्दा बनकर यांनी रंगभूषा तर प्रसाद भिलोरे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. किशोर दळवी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे, माढा, करमाळा, सोलापूर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.