मुंबई : दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक राम तेरी गंगा मैली या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रेम ग्रंथ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते.
सिनेसृष्टीतील गुणी कलाकार हरपला – अमित विलासराव देशमुख
आपल्या अभिनय कौशल्याचा अमिट ठसा रसिक प्रेक्षकांच्या मनावर ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांनी उमटविला आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतील गुणी कलाकार हरपला आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी राजीव कपूर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
श्री. देशमुख शोकसंदेशात म्हणतात, राजीव कपूर हे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचा कलेचा वारसा लाभल्यामुळे त्यांचा अभिनयही रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा होता. त्यांचे चित्रपट निवडक जरी असले तरी त्यामधील त्यांच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. ते विशेषतः ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृतदेह आढळला