मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘एमरजन्सी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, कायमच कॉँग्रेसला धारेवर धरणारी कंगना या चित्रपटात चक्क भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. ‘आणीबाणी’ ही देशातील सर्वांत मोठी राजकीय घटना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात कंगना केवळ अभिनयच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
कंगना राणावत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर झाले आणि तिचा पहिला लूक समोर आला. या लूकला चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर काही दिवसांतच अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आता भाजपनेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे. ही भूमिका मराठी अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार आहे.
याबाबत कंगनाने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टला कंगनाने ‘एक सच्चा राष्ट्रवादी.. ज्यांचे देशावर अमाप प्रेम आणि अभिमान अतुलनीय होता. आणीबाणीच्या काळात घडलेला एक तरुण नेता..’ असे कॅप्शन दिले आहे.
तर अभिनेता श्रेयस तळपदे यानेही ही पोस्ट शेअर केली आहे. ‘बाधाएं आती हैं आएं.. घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।’ अशी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता त्याने शेअर केली आहे.