25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमनोरंजनवाढदिवस महानायकाचा

वाढदिवस महानायकाचा

एकमत ऑनलाईन

आज ११ ऑक्टोबर हिंदी चित्रपटसृष्टीचा शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. अमिताभ बच्चन मोजायला गेले तर फक्त साडेसात अक्षरी नाव पण या साडेसात अक्षरी नावातच अभिनयाची अख्खी संस्था सामावली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली पन्नासहुन अधिक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच.

अमिताभचा वाढदिवस म्हणजे आपल्या घरातील सदस्याचाच वाढदिवस असा समज देशातील कोट्यवधी कुटुंबाचा आहे कारण अमिताभ म्हणजे आपल्याच घरातील एक सदस्य अशीच भावना देशातील १३० कोटी जनतेची आहे. म्हणूनच १९८२ साली कुली चित्रपटातील चित्रीकरणात त्याला झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर त्याला बरे वाटावे म्हणून रसिकांनी देव पाण्यात घातला. त्याचीच पुनरावृत्ती त्यांना कोरोनाची बाधा झाली त्यावेळी झाली. त्यांना दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तेंव्हा त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर जणू स्वतःच्या घरातील व्यक्तीलाच पुरस्कार मिळाला आहे असा आनंद प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

गेली पन्नास वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन यांनी तीन पिढ्यांना भुरळ घातली. एकाच घरातील आजोबा, वडील आणि मुलगा असे त्यांचे चाहते आहेत. असा चाहतावर्ग निर्माण करणारे ते एकमेव अभिनेते आहेत. सात हिंदुस्थानी या पहिल्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले, ताड माड उंचीचा घोगरा आवाज असलले, किडमीडित बांध्याचे अमिताभ बच्चन यांनी मोठ्या परिश्रमातून सुपरस्टार पद मिळवले. ज्या काळी अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्या काळात देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, जितेंद्र, शशी कपूर, विनोद खन्ना या देखण्या नटांची चलती होती. राजेश खन्ना हा तर सुपरस्टार पदावर पोहचला होता. राजेश खन्नाने आपला स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला होता अशा काळात अमिताभ तग धरतील का याबाबत शंका होती.

सीबीआयने स्विकारली हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाची सूत्रं

सात हिंदुस्थानी सह सलग नऊ चित्रपट फ्लॉप होऊनही न डगमगता चित्रपटसृष्टीत त्यांनी पाय रोवले १९७३ साली प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजिर या चित्रपटाने त्यांना खरा ब्रेक मिळवून दिला हा चित्रपट तुफान हिट झाला. या चित्रपटाने त्यांना अँग्री यंग मॅन ही ओळख निर्माण करुन दिली. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद ( १९७१ ) या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. जंजिरने त्यांना जो ब्रेक थ्रू मिळवून दिला त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही. अभिमान, दिवार, शोले, कभी कभी,अमर अकबर अँथनी, मुक्कदर का सिकंदर, त्रिशूल, डॉन,काला पत्थर, नशीब, लावरीस, नमक हलाल,सिलसिला, कुली, शराबी, मर्द, अग्निपथ यासारखे अनेक चित्रपट सुपरडुपर हिट झाले. हे चित्रपट इतके चालले की त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

आपल्या जबरदस्त अभिनयाच्या बळावर व प्रभावी संवाद फेकीच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनी कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अमिताभ बच्चन यांनी शेकडो चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांनी १९ चित्रपटासाठी पार्श्वगायनही केले. मिस्टर नटवरलाल चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. आतापर्यंत त्यांना १४ फिल्मफेअर पुरस्कार, दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या किताबांनी गौरवले आहे. याशिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशातही त्यांचे सन्मान झाले आहेत. सात हिंदुस्थानी या पहिल्या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजतागायत चालू आहे.

आज वयाच्या ७८ व्या वर्षीही त्यांची काम करण्याची उर्मी कमी झालेली नाही. तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह असतो. अमिताभ म्हणजे साक्षात अभिनयाची संस्थाच. त्यांच्या अभिनयाची मिमिक्री करणारेही पुढे जाऊन सिलिब्रेटी बनले. ज्यांना किडमीडित शरीरयष्टी व ताडमाड उंचीमुळे सुरवातीला चित्रपट मिळत नव्हते त्यांनी अभिनयाची अशी उंची गाठली की त्यांच्या अभिनयाच्या उंचीपर्यंत पोहचणे कोणालाही शक्य झाले नाही. ज्या आवाजाला घोगरा आवाज आहे म्हणून आकाशवाणीने प्रवेश नाकारला तोच आवाज गेली पन्नास वर्ष चित्रपटसृष्टीचा आवाज बनला. वन मॅन इंड्रस्ट्री ही बिरुदावली गेली पन्नास वर्ष त्यांनी समर्थपणे मिरवली कारण चित्रपटसृष्टीवर त्यांनी एकहाती राज्य केले. त्यांच्या जवळपास कोणताही अभिनेता पोहचू शकला नाही.

स्वामी अटकेविरोधात रांचीत आंदोलन

या दरम्यान त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघाताने त्यांना मृत्युच्या दारात उभे केले पण कोट्यवधी चाहत्यांचा प्रार्थनेने तेंव्हा यमराजालाही हार मानवी लागली. त्यांनी स्थापन केलेली एबीसीएल ही कंपनी डबघाईस आल्यावर त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागले. पण स्वतःची हुशारी आणि कष्टाच्या जोरावर ते त्यातूनही बाहेर पडले. आपल्या प्रतिमेच्या प्रेमात न पडता कौन बनेगा करोडपती हा टीव्ही शो त्यांनी स्वीकारला आणि त्यातही आपला ए वन ठसा उमटवला. अमिताभ बच्चन जितके अभिनेते म्हणून महान आहे तितकेच ते व्यक्ती म्हणूनही महान आहेत.

त्यांचा इतका नम्र अभिनेता शोधूनही सापडणार नाही. सुपरस्टार असूनही कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉटसीटवर बसणाऱ्या सर्वसामान्य स्पर्धकांशी ते ज्या नम्रतेने वागतात ते अनुकरणीय आहे. त्यांच्या सामाजिक बंधीलकीचे तर काय वर्णन करावे जेंव्हा देशात नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा मदत करण्यात अमिताभ बच्चन सर्वात पुढे असतात. त्यांनी हजारो आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद कुटुंबांना दत्तक घेतले आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी त्यांच्या वाढदिवशी प्रार्थना. या महान कलाकाराबद्दल एव्हढेच म्हणावेसे वाटते की तू न थकेगा कभी…. तू न रुकेगा ,कभी…. हॅपी बर्थडे बिग बी……

श्याम ठाणेदार दौंड
जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या