मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठी प्रेक्षकांचा तो लाडका अभिनेता. या प्रवासात त्याची बायको मंजिरीने त्याला भक्कम साथ दिली.
म्हणून बायकोचा विषय येतो तेव्हा प्रसाद तिच्याबद्दल अगदी भरभरून बोलताना दिसतो. याउलट अन्य नातेवाईक मात्र त्याला नकोसे वाटतात. होय, एका मुलाखतीत प्रसाद त्याच्या नातेवाईकांबद्दल जरा स्पष्टच बोलला.
सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून मला बरंच काही ऐकायला मिळालं. अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असतीस. वगैरे म्हणणारे नातेवाईक आज २२-२५ वर्षांनंतर त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात.
हेही मला आवडत नाही. नातेवाईक हा प्रकार मला नकोनकोसा वाटतो. कारण त्यांच्याकडून मला कधी काही चांगलं नाही मिळालं दुर्दैवाने. हे वास्तव आहे. आज ते ही मुलाखत ऐकत असतील तर त्यांना वाईट वाटेलही. पण वाटू दे, त्यात मी काहीही करू शकत नाही. मला जे काही दिलं ते बायकोने दिलं. माझ्यावरचे संस्कार माझ्या शिक्षकांनी दिले. माझ्यातलं गाणं माझ्या आईकडून आलं. नातेवाईकांनी मला काहीही दिलं नाही, असे प्रसाद म्हणाला.