मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत होता. पोस्टरवरून काहीतरी भन्नाट असणा-या या चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने यावरील पडदा उठला असून झिम्मा चा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे.
बायकांच्या मनात काय सुरु आहे,त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणे कठीणच असते. अशाच वेगवेगळया व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला झिम्मा मध्ये पाहायला मिळणार आहे. झिम्मा च्या टिझरवरूनच हा चित्रपट खूप धमाकेदार असणार याचा अंदाज येतो.
इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक दिसत आहे. इंग्लंडला जाण्यासाठी नव-याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणे करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोट सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळया पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळया विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वत:शी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी झिम्मा हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.
या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदा-या काही काळासाठी विसरून फक्त स्वत:साठी स्वच्छंदी आयुष्य जगणा-या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणा-या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे झिम्मा चा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही.
चलचित्र कंपनी प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित झिम्मा हा सिनेमा येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अंिजक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
स्फोटक प्रकरणात एनआयएला संपूर्ण सहकार्य गृहमंत्री अनिल देशमुख; अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार