मुंबई : ‘महाभारत’ फेम अभिनेते पुनीत इस्सार सध्या चर्चेत आहेत. पुनीत यांचे खाते हॅक करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने पुनीत इस्सार यांचे १३.७६ लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. पुनीत इस्सार यांच्या दक्षिण मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आरोपीने सर्वांत आधी त्यांचा ईमेल हॅक केला. त्यानंतर १३.७६ लाख रुपये चोरण्याचा प्रयत्न केला. काही कारणाने पुनीत यांनी ईमेल पाहिला तेव्हा ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली.
फसवणुकी प्रकरणी पुनीत इस्सार यांनी ओशिवरा पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. दरम्यान पोलिस अधिका-याने सांगितले, आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या आरोपीला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुनीत इस्सार हे महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. या भूमिकेने त्यांना घराघरांत ओळख दिली. अनेक मालिका आणि सिनेमांत त्यांनी काम केले आहे. ‘बिग बॉस’मध्येही ते झळकले होते. पुनीत इस्सार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘द काश्मिर फाइल्स’ या सिनेमातदेखील काम केले आहे.
पुनीत इस्सार यांच्या आधी ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक करण्यात आली होती.