मुंबई – सध्या देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू आहे. मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर हिंदू पक्षाच्या वतीने शृंगार गौरीची नियमित पूजा आणि इतर देवतांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या वादादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती.
तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’ रिलीज होण्यापूर्वी तिने बाबा विश्वनाथचे दर्शन घेतले आहे. तिथे तिने आपल्या टीमसोबत पूजादेखील केली. देशात सुरू असलेल्या या वादावर आता कंगना राणावतने प्रतिक्रिया देत ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर आपले मत मांडले आहे.
‘धाकड’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने ज्ञानवापी मशीद वादावर आपले मत मांडले आहे. मशिदीतील शिवलिंगाच्या दाव्यावर तिला प्रश्न विचारला असता तिने म्हटले, ‘काशीच्या प्रत्येक कणात महादेव वसला आहे’. कंगना राणावत म्हणाली, ‘जसे भगवान कृष्ण मथुरेच्या प्रत्येक कणात आहे, प्रभू राम अयोध्येच्या प्रत्येक कणात आहे, त्याचप्रमाणे काशीच्या प्रत्येक कणात महादेव आहे. त्यांना कोणत्याही रचनेची गरज नाही.’ यासोबतच तिने हर हर महादेवचा जयघोषदेखील केला.