मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात अडकला आहे. अशातच आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे की, पठाण चित्रपटाचे ओटीटी अधिकार करोडोंमध्ये विकले गेले आहेत व लवकरच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत.
२५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘पठाण’ चित्रपट मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हीडीओने शनिवारी १०० कोटींमध्ये खरेदी केला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान जवळपास ४ वर्षांनंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. २५ जानेवारी २०२३ मध्ये शाहरूखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरूख व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील.