नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ओटीटी म्हणजेच ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणा-या कंटेंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणा-या गोष्टींचेही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ऍमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटसंदर्भात चिंता व्यक्त करणारे वक्तव्य केले आहे. ऍमेझॉन प्राईमवरील तांडव या वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे़
अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर आज न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणा-या गोष्टींचीही स्क्रीनिंग झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. म्हणजेच ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो पाहून त्यामधील बदल सुचवते तसे ओटीटीवरील कंटेंटसाठीही अशाप्रकारचे प्रदर्शानापूर्वीचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. हा कंटेट दाखवण्यासंदर्भातील परवानगी मिळाल्यानंतर तो दाखवण्यात आला पाहिजे, असे न्यायमूर्तींना सूचित करायचे होते़
ज्येष्ठांना खासगी रुग्णालयातही प्राधान्य द्या