मुंबई : ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये सामंथाने घटस्फोट आणि त्यानंतर बदललेल्या आयुष्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने मागच्या वर्षी अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता.
मात्र घटस्फोटानंतर सामंथाने त्यावर स्पष्ट बोलणे नेहमीच टाळले होते. पण आता ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये तिने घटस्फोट आणि त्यानंतर बदललेल्या आयुष्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. या शोमध्ये सामंथाने घटस्फोट घेणं किती कठीण आणि वेदनादायी होतं याचा खुलासा केला.
करण जोहरने सामंथाला या शोमध्ये तिच्या घटस्फोटाबद्दल विचारल्यानंतर सामंथाने हे खूपच वेदनादायी होतं हे कबूल करतानाच त्यामुळे तिला किती त्रास झाला तसेच तिचे जीवन कसे आणि किती बदलले यावरही भाष्य केले. हे सर्व सांगताना ती भावूक झाली. करणच्या प्रश्नाचे उत्तर देताना सामंथा म्हणाली, ‘‘घटस्फोट आणि हे सगळं माझ्यासाठी फार कठीण आणि वेदनादायी होतं.
पण सगळं ठीक आहे. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर आता मी पूर्वीपेक्षा जास्त खंबीर झाले आहे.’’ यावर करण म्हणाला, ‘‘म्हणजे आताही परिस्थिती ठीक नाही का?’’ यावर सामंथा म्हणाली, ‘‘आता नाही. पण कदाचित भविष्यात सर्व परिस्थिती ठीक होईल.’’