मुंबई : दोन वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी दुपारी जेव्हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने स्वत:च्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर बॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास केला होता. मात्र त्याने घेतलेल्या अचानक एग्झिटमुळे अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सुशांतच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत, त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री सारा अली खाननेही सुशांतसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटात तिच्यासोबत सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती.
सारा अली खानची पोस्ट :
‘पहिल्यांदा कॅमेराला सामोरं जाण्यापासून ते तुझ्या दुर्बिणीतून पहिल्यांदा गुरू आणि चंद्र पाहण्यापर्यंत- तुझ्यामुळे अनेक गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या. ते सर्व क्षण आणि आठवणी मला दिल्याबद्दल धन्यवाद. आज पौर्णिमेच्या रात्री जेव्हा मी आकाशाकडे पाहीन तेव्हा मला माहित आहे की तू तिथे तुझ्या आवडत्या तारे आणि नक्षत्रांसोबत चमकत असशील. आता आणि कायमचं,’ अशा शब्दांत साराने तिच्या भावना व्यक्त केल्या.