मुंबई : २०२२ बॉलिवूड चित्रपटांसाठी फारसे चांगले गेले नाही. यंदा काही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. चित्रपटांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यामुळे कोट्यवधींचा खर्च केलेले चित्रपट देखील फ्लॉप झाले.
या काळात बॉलिवूडमधील काही मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’पासून विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मिर फाईल्स’चा समावेश आहे.
गंगूबाई काठियावाडी
संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट मुंबईतील कामाठीपु-यात वेश्याव्यवसाय करणा-या स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणा-या गंगूबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाने १५०कोटींचा आकडा पार केला होता.
द काश्मिर फाईल्स
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटावर अनेकांनी टीका केली. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटी कमावले. या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवण्यात आला होता.
भूलभुलैय्या २ : अभिनेता कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटाने १८५ कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.
ब्रह्मास्त्र : दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या या चित्रपटाने २५७ कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. आगामी काळात या चित्रपटाचे आणखी दोन भाग प्रदर्शित होणार आहेत.
दृश्यम २ : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘दृश्यम २’ बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने २३० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.