मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. मराठी मालिका, चित्रपट, नाटकांचं प्रमोशन करण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार यामध्ये हजेरी लावतात. तसेच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे प्रमोशनही या शोमध्ये करण्यात आले आहे. पण अनेकदा हा शो वादात अडकला आहे.
शोमध्ये तोच तो पणा आल्याचेही प्रेक्षकांनी म्हटले होते. तर आता या शोमध्ये मराठी कलाकारांनाच दुय्यम वागणूक दिल्याचेही म्हटले जात आहे.
गेल्या महिन्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पाच दशके त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याच निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील अशोक सराफ यांच्यासाठीचा खास एपिसोड प्रेक्षकांनी पाहिला. पण या एपिसोडमधील एक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड खटकली आहे.
बॉलिवूडच्या हिंदी चित्रपट ‘जुग जुग जिओ’चे कलाकार देखील या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी आले होते. कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शोमधील परीक्षक स्वप्निल जोशी त्यांच्यासोबत एकत्र बसल्याचे दिसून आले. परंतु अशोक सराफ यांच्यासाठी आयोजित खास भागात मात्र तो त्याच्या परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला दिसून आला होता.