23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनलाल महालातील ‘लावणी’ पडली महागात; चौघांवर गुन्हा दाखल

लाल महालातील ‘लावणी’ पडली महागात; चौघांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या लावणीवर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी आक्रमक भूमिका देखील घेतली. वैष्णवी पाटील आणि सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोध दर्शवला. पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे असे होता कामा नये, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षा रक्षकाला हाताशी धरून लाल महालात लावणीचे शूटिंग केल्याचा आरोप होत आहे. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचे शूटिंग केले आहे तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली.

काय आहे या व्हीडीओमध्ये..
सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हीडीओ शूट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.

संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक
पुणे महापालिका आणि सुरक्षा रक्षकांकडून उन्हाळ्याच्या सुटीत लाल महाल बंद ठेवण्यात आला होता. अनेक पर्यटक या ठिकाणी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. लाल महाल पर्यटकांसाठी आहे. तो रिल्स बनवण्यासाठी नाही आणि लावणीसाठीतर अजिबात नाही, असे मत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेत्रीने मागितली माफी
१३ तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हीडीओमध्ये माफी मागत वैष्णवी म्हणाली की, एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे. काही दिवसांपूर्वी लाल महालात मी चंद्रा गाण्यावर व्हीडीओ केला होता. मी जेव्हा तो व्हीडीओ केला तेव्हा माझ्या ध्यानीमनीही पुढे असे काही होईल याचा विचार आला नाही. पण ती चूक माझ्याकडून झाली आणि ती मी मान्यही करते. तुमच्याप्रमाणेच मीही एक शिवप्रेमी आहे. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेस ठेच पोचवण्याचा माझा कधी हेतू नव्हता आणि पुढेही नसेल. यासाठी मी सर्वांची जाहीर माफी मागते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या