मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असून,शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधणार आहेत.विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिवसेनेने यापूर्वीच उर्मिला यांच्या नावाची शिफारस केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्या बाजूला झाल्या होत्या. आता त्यांना शिवसेनेने राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेत पाठवण्याचे ठरवले आहे. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या १२ जणांच्या यादीत त्यांचा समावेश आहे.
आता त्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत. कंगना राणावत प्रकरणात त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू जोरदारपणे मांडली होती.चित्रपटसृष्टीतील त्यांचे स्थान मोठे तर आहेच पण त्यांना वैचारिक भूमिका देखील आहे.शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर आपली बाजू भक्कमपणे मांडायला उर्मिला यांच्या रूपाने एक चांगले नेतृत्व मिळणार आहे.उर्मिला या मंगळवारी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश करतील.त्यानंतर त्या पत्रकारपरिषद घेउन आपली भूमिका मांडणार असल्याचेही कळते.