मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडला टॉलीवूडनं नाकीनऊ आणले आहे. त्यांचे एकाहून एक सरस असे चित्रपट प्रदर्शित होऊन त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षी अल्लु अर्जुनच्या पुष्पाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर राजामौली यांच्या आरआरआरनं थिएटरमध्ये धुमाकुळ घातला होता.
यासगळ्यात आता कमल हासन यांच्या ‘विक्रम’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटानं भारतात १०० तर जगभरातून दीडशे कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विक्रम बरोबरच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज ’हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबर ‘मेजर’ हा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या पृथ्वीराजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. तुलनेने पृथ्वीराजला मिळालेले ओपनिंग फारसं वाईटही नाही. मात्र विक्रमच्या कमाईच्या आकड्यांसमोर ते ओपनिंग कमी आहे.