नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमधील वाढत्या इथेनॉल मिश्रणामुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या आणि मायलेज कमी होत असल्याच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळले आहे. सोशल मीडियावर जे काही फिरत आहे, तो एका सुनियोजित खोट्या नरेटिव्हचा भाग आहे. मला अशी एक तरी कार दाखवा जिचे ई २० इंधनामुळे नुकसान झाले आहे असे थेट आव्हान गडकरींनी दिले आहे. याचबरोबर नितीन गडकरी यांनी मान्य केले की पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचे कॅलरीफिक मूल्य कमी असते, ज्यामुळे इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास सरासरी मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते. मात्र, बहुतांश वाहनांवर याचा परिणाम नगण्य असेल.
ते पुढे म्हणाले, मायलेज केवळ इंधनावर नाही, तर ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमधील ट्रॅफिकमध्ये गाड्या सतत खालच्या गियरमध्ये चालवाव्या लागतात. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यानच्या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला सतत ब्रेक दाबावे लागतात आणि वेग ४०-५० किमी प्रतितासच्या वर जात नाही. अशा स्टॉप-अँड-गो ट्रॅफिकपेक्षा जेव्हा तुम्ही महामार्गावर १०० किमी प्रतितासच्या स्थिर वेगाने गाडी चालवाल, तेव्हाच तुम्हाला मायलेजमध्ये फरक जाणवू शकतो. एआरएआयच्या अहवालानुसार, फ्लेक्स-इंधन इंजिनसाठी तयार केलेल्या वाहनांमध्ये मायलेजची कोणतीही समस्या नाही.
इंजिन खराब होण्याचे कारण भेसळ
सोशल मीडियावरील इंजिन खराब झाल्याच्या दाव्यांवर गडकरी म्हणाले की, त्यांनी वाहन कंपन्यांना अशा काही प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. या तपासात इंजिन खराब होण्यास इथेनॉल नाही, तर भेसळयुक्त इंधन जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इथेनॉल आणि मिथेनॉलमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय
नितीन गडकरी यांनी सांगितले की, सध्या इथेनॉलची किंमत सुमारे ७५ रुपये प्रतिलीटर आहे. सरकारचा उद्देश जनतेला वेगवेगळया किमतीत इंधनाचे अनेक पर्याय देण्याचा आहे. ब्राझील १९७० पासून २७% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरत आहे आणि तिथे होंडा, ुंदाई सारख्या कंपन्यांच्या गाड्या कोणत्याही समस्येशिवाय चालत आहेत. भारतात टाटा मोटर्स, महिंद्रा, ुंडाई, टोयोटा आणि मारुती सुझुकी यांसारख्या जवळपास डझनभर कंपन्या फ्लेक्स-इंधन मॉडेल्स आणत आहेत. याशिवाय, आसाम पेट्रो-केमिकल्स रोज ७०० टन मिथेनॉल तयार करत असून त्याची किंमत केवळ २०-२२ रुपये प्रतिलीटर आहे, तर डिझेल ११० रुपयांच्या आसपास आहे. मिथेनॉल आणि आयसो-ब्युटेनॉलच्या वापरामुळे भारताची तब्बल २ लाख कोटी रुपयांची जीवाश्म इंधन आयात पूर्णपणे थांबू शकते आणि प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
















