मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या गाजावाज्यानंतर आता राज्यातील गरीब महिलांना मिळणारी मोफत साडी योजना राज्य सरकारने बंद केली आहे. आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे करत वस्त्रोद्योग विभागाने हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की भाऊराया देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे साहेब, २१००-१५०० सोडा, आता लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडेनाशी झाली? निवडणुकीपूर्वी महिलांना विविध योजनांची आश्वासने देण्यात आली, घोषणा करण्यात आल्या आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र आता आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे करून एकामागून एक योजना बंद केल्या जात आहेत. जर राज्याची आर्थिक स्थिती इतकीच बिकट होती, तर निवडणुकीत ही आश्वासने कोणत्या हिशेबाने देण्यात आली होती? तुम्ही तर इस्टेटसाठी बहिणीला खोटे आश्वासन देऊन हक्कसोड पत्र मिळवणा-या भावापेक्षाही वाईट आहात. आधी मतांसाठी विविध आश्वासने दिली आणि आता निवडणुका संपल्यानंतर तीच आश्वासने व योजना काढून घेत आहात अशी टीका त्यांनी केली.
योजनांमध्ये कपात करणे हा विश्वासघात
महिलांच्या नावावर राजकारण करून त्यांच्याच योजनांमध्ये कपात करणे हा विश्वासघात असल्याचा आरोप करत, सरकारने महिलांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि योजनांबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे.
















