नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावत ९३ महसूल मंडळांपैकी तब्बल ७३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेषत: किनवट, माहूर, मुदखेड, हदगाव, अधार्पूर, उमरी, कंधार, लोहा आणि नांदेड तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद किनवट तालुक्यातील उमरी बाजार महसूल मंडळात २५१.५० मिमी झाली असून त्यानंतर मांडवा २३९.७५ मिमी, माहूर २२३ मिमी, देहळी १९४.५० मिमी, वाई १९४.५० मिमी, सिंदखेड १९४.५० मिमी, सिंदगी १४१ मिमी, वानोला १४१ मिमी, खानापूर (देगलूर) १३८ मिमी आणि चांदोळा (मुखेड) १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.मुदखेड तालुक्यात मुदखेड येथे ११५ मिमी, मुगट येथे ११०.५० मिमी, तर अधार्पूर येथे १०३ मिमी, उमरी येथे १०४ मिमी, हदगाव तालुक्यात निवघा येथे ११३ मिमी आणि तळणी येथे १०९.५० मिमी पावसाची नोंद झाली. कंधार, लोहा, नांदेड, बिलोली, भोकर, हिमायतनगर, धमार्बाद आणि नायगाव तालुक्यांतील बहुतांश महसूल मंडळांतही ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
नांदेड शहर व परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली. नांदेड शहर, टुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, लिंबगाव, तरोडा आणि नाळेश्वर महसूल मंडळांत ६८ ते ९९ मिमी दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, रस्त्यांवर पाणी वाहणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.
















