इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत एक मोठा स्फोट झाला असून कोर्टाच्या बेसमेंट भागात हा स्फोट झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इमारतीला हादरा बसला असून मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
स्फोट इतका भीषण होता की बेसमेंटमधील वस्तूंचे तुकडे होऊन ते वरच्या
मजल्यापर्यंत उडाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तातडीने परिसर सील केला आहे. स्फोटाचे नेमके स्वरूप काय होते आणि यामागे घातपाताचे कारण आहे की अन्य कोणते, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याबद्दलची ताजी आकडेवारी प्रतीक्षेत आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणांची आणि संभाव्य नुकसानीची चौकशी सुरू आहे. संवेदनशील भागात ही घटना घडल्यामुळे इस्लामाबादमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

