पुणे : ‘कोरेगाव भीमा येथील दंगलीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दंगलीस जबाबदार धरावे अशी मागणी करणारा अर्ज वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्या वतीने अॅड. किरण कदम यांनी हा अर्ज दाखल केला असून आयोगाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २०२० मध्ये पत्र दिले होते. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे आयोगाकडे दाखल करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली होती. ‘ही दंगल म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता. कोरेगाव भीमा दंगलीवेळी फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. सरकारने दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घातले आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली. दंगलीचे पुरावे पोलिसांनी मोडूनतोडून सादर केले. सरकारने पोलिसांच्या मदतीने कट रचला असा आरोप करून कोरेगाव भीमा दंगलीची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी पत्रात केली होती.
आयोगाने बजावली होती नोटीस
आयोगाने हे पत्र दाखल करण्याचे पवार यांना आदेश दिले होते. ते पत्र उपलब्ध नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. या पत्रासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आयोगाने नोटीस बजाविली होती. त्यावरील पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे असेल, असे ठाकरे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयानेही संबंधित पत्र सादर केलेले नाही, असे अॅड. कदम यांनी सांगितले.
एखादा पक्ष आवश्यक पुरावे सादर करीत नसेल तर न्यायालय किंवा आयोग त्या पक्षाविरोधात विपरीत निष्कर्ष (अॅडव्हर्स इनफरन्स) काढू शकतो. त्यानुसार आयोगाने विपरीत निष्कर्ष काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

