बुलडाणा : तालुक्यातील राजुरा शिवारात एका पित्याने आपल्या चार मुला-मुलींना विहिरीत फेकून स्वत:ही उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २५ मे रोजी उघडकीस आली आहे. या घटनेत पित्यांसह दोन मुले आणि दोन मुली अशा पाच जणांचा मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मुसा किराडीया (२७, रा. राजुरा ग्रामपंचायत उमापूर) यांनी घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्यांनी आपल्या प्रीत (७), प्राची (५), पूर्वी (३) व पीयूष (दीड वर्ष) या चौघांना विहिरीत टाकून स्वत:ही विहिरीत उडी घेतली. ही घटना २४ तारखेच्या मध्यरात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, २५ मे रोजी सकाळच्या सुमारास विहिरीत तीन मृतदेह तरंगताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पाचही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पती-पत्नीतील वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















