नवी दिल्ली : अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत-अमेरिकेतील संबंध आणि अमेरिकन अधिकार्यांच्या भारतातील वारंवार भेटीबद्दल बोलताना भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी एफबीआय संचालकांच्या भेटीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी अमेरिकेबाहेर भेट दिलेल्या देशांच्या यादीत भारत पहिला आहे. या वर्षात त्या चार वेळा येथे आल्या आहेत. राज्य सचिव अँटनी ब्लिंकन तिसऱ्यांदा येथे आले होते आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन दुसऱ्यांदा भारतात आले होते. आता एफबीआयचे संचालक पुढील आठवड्यात येथे येणार आहेत.
ख्रिस्तोफर रे अशा वेळी भारत भेटीवर येत आहेत जेंव्हा काही दिवसांपूर्वी अमेरिकेने न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका शीख फुटीरतावादी अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा डाव हाणून पाडल्याचा दावा केला होता. याप्रकरणी अमेरिकेने भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर आरोप केले होते. त्यांना भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याकडून सूचना मिळाल्याचा आरोप कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे.