तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला करण्यासह सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्तेची धमकी दिल्यानंतर धास्तावलेल्या इराणकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या धमकीनंतर खामेनी यांनी जीव वाचविण्यासाठी तेहरानमधील बंकरचा आसरा घेतला आहे असे वृत्त इराणमधील माध्यमांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
अमेरिकेच्या धमकीनंतर खामेनी तेहरानमधील बंकरमध्ये लपले आहेत असे वृत्त समोर आले आहे. तेहरानमधील अंतर्गत विविध बोगद्यांना हा बंकर जोडला गेल्याचे वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन सैन्य समुद्रमार्गाने इराणच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे वक्तव्य अलिकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. यानंतर अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता बळावली आहे. आता इराणकडून खबरदारी म्हणून उपाययोजना सुरु केल्याचे दिसून येते.
मुलाकडे खामेनींच्या कार्यालयाचे कामकाज
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी बोगद्यात आसरा घेतल्यानंतर त्यांचा तिसरा मुलगा मसूद वडिलांच्या कार्यालयाचे कामकाज पाहणार आहे. मसौद सध्या इराणचे सरकार आणि खामेनी यांच्यातील संवादाचे मुख्य माध्यम असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील संबंधांचे स्वरूप बदलले?
ट्रम्प प्रशासनाने महागाई आणि भाववाढीवरून सुरू असलेल्या निदर्शनांना दडपण्यासाठी इराणने बळाचा वापर केल्यास अमेरिकेकडून कारवाई केली जाईल, अशी खमेनी राजवटीला धमकी दिली होती. पण, ती धमकी आता मावळल्याचे दिसते. अमेरिकेचे अनेक सैनिक आता मध्य आशियाई देशाच्या दिशेने कूच करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांचे स्वरूप बदलल्याचे दिसत आहे.
अमेरिकेला इराणचा इशारा
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी काही दिवसांपूर्वी धमकीवरून अमेरिकेलाही इशारा दिला होता. खामेनी यांच्यावरील कोणताही हल्ला हा देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यासारखे मानले जाईल, असे मसूद म्हणाले होते. खमेनी यांच्यावरील हल्ल्याला जिहादच्या घोषणेने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणी विद्यार्थी वृत्तसंस्थेने दिला होता.

