अंबड : अंबड तालुक्यातील शिरनेर येथे गुरुवारी पहाटे साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान एका किराणा दुकानासमोर चाकू छातीत मारून एकाचा खून केल्याची घटना घडल्याने अंबड शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील संशियत अंबड शहरातील म्हाडा कॉलनीतील गणेश बाबुराव खरात याने फिर्यादीच्या मुलास गुरुवारी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान सिगारेट आणण्याच्या निमित्ताने सोबत घेऊन हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून यातील फिर्यादीचा मुलगा सदानंद आबाजी वैद्य(२५) वर्षे याला शिरनेर गावातील सोपान दिवटे उर्फ बटर याचे दुकानासमोर छातीत चाकूने मारून खून केल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, अंबड पोलिस ठाण्याचे प्रमुख नितीन पतंगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अंबड पोलिस ठाण्यात यातील मयताचा पिता आबाजी भानुदास वैद्य यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.